राज्यातील पहिले अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदान कोल्हापुरच्या तुरूकवाडीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

रविवारी दुपारी 3 वाजता शाहुवाडी तालुक्‍यातील तुरूकवाडी येथे दत्तसेवा विद्यालयाच्या पटांगणावर हे कुस्ती मैदान होणार आहे. 

कोकरूड (कोल्हापूर) : मागील वर्षभर कोरोनाचे संकट जगभर पसरल्याने कुस्तीबरोबर इतर सर्वच खेळांचे नुकसान झाले. त्यात कुस्ती क्षेत्राचे जास्तच नुकसान झाल्याने अनेक पैलवानांनी कुस्ती सोडली. कुस्ती मैदाने परत चालू व्हावीत व यातून खेळाडूंना खुराकसाठी थोडी मद्दत व्हावी; या उद्देशाने शिराळा व शाहुवाडी तालुक्‍यातील 'कुस्ती हेच जीवन'च्या टीमने कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. 

रविवारी दुपारी 3 वाजता शाहुवाडी तालुक्‍यातील तुरूकवाडी येथे दत्तसेवा विद्यालयाच्या पटांगणावर हे कुस्ती मैदान होणार असून; यावेळी क्रमांक एकची कुस्ती पै. विकास पाटील-मांगरूळ विरुद्ध पै. प्रदीप ठाकूर- हांडे तालीम, सांगली; क्रमांक दोनची कुस्ती पै. उदय खांडेकर- वारणा तालीम विरुद्ध पै. अंजीर पाटील- न्यू मोतीबाग कोल्हापूर यांच्यात होणार आहे. या मैदानात एकून 25 लढती होणार आहेत. 

हेही वाचा - वनविभाग आमचे रक्षण कधी करणार असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे 

 

हे मैदान 'कुस्ती हेच जीवन'च्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. मैदानाचे आयोजन शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होईल. यावेळी 'कुस्ती हेच जीवन'चे महाराष्ट्र राज्य संस्थापक रामदास देसाई, अध्यक्ष अनिल पाटील, तसेच शिराळा व शाहुवाडी तालुक्‍यातील मान्यवर मंडळी ही उपस्थित राहणार आहेत. 

"गेले वर्षभर झालेले कुस्तीक्षेत्राचे नुकसान भरून निघण्यासाठी मैदानांचे आयोजन होणे गरजेचे आहे. त्यामुळेच 'कुस्ती हेच जीवन' महासंघाच्या वतीने राज्यातील पहिले शासन नियमानुसार अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदान घेण्यात येणार आहे." 

- मनोज मस्के, अध्यक्ष, कुस्ती हेच जीवन, शिराळा तालुका 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online wrestling in turukwadi kolhapur from youtube and facebook live in kolhapur