
गडहिंग्लज : अलीकडील काही वर्षांत मेडिकल हब म्हणून पुढे आलेल्या गडहिंग्लज शहरातील खासगी हॉस्पिटल्सना आता ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. कोरोनामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येते. कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्याच्या सूचना शासनाने उत्पादक व वितरकांना दिल्या आहेत. परिणामी, आवश्यकतेपेक्षा 50 टक्के सिलिंडरच मिळत असून खासगी दवाखान्यातील दाखल रुग्णांवर उपचारात अडथळे येत असल्याचे चित्र आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गडहिंग्लज शहरासह विभागातही रुग्णांचा आलेख उंचावला आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ते दहा दिवसांत बरे होऊन घरी जात आहेत. परंतु, 50 वर्षावरील आणि इतर व्याधीग्रस्त लोकांना ऑक्सिजनची अत्यावश्यकता वाढत आहे. गडहिंग्लजला उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर कार्यरत झाले आहे.
याठिकाणी 25 हून अधिक रुग्ण दाखल आहेत. यातील बहुतांशी जणांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी दवाखान्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा येऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादक व वितरकांतर्फे होणाऱ्या पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र खासगी दवाखान्यांना ऑक्सिजनपुरवठ्यात अडथळे येत आहेत. आवश्यकतेपेक्षा 50 टक्केच पुरवठा होत असल्याने रुग्णसेवेला मर्यादा येत असल्याचे सांगण्यात येते. त्यातच उपजिल्हा रुग्णालय कोविडसाठी राखीव केल्याने इतर आजारांचे रुग्ण खासगीमध्ये जात आहेत.
गडहिंग्लज शहर व तालुक्यातील मागणीधारकांना ऑक्सिजन सिलिंडरपुरवठा करण्याचे काम तिघा वितरकांकडून होते. आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यातीलही रुग्ण गडहिंग्लजला येत असतात. याशिवाय दोन धर्मादाय रुग्णालयेही कार्यरत आहेत. मेडिकल हब म्हणून परिचित असलेल्या गडहिंग्लजला बहुतांश ठिकाणी आयसीयू, एनआयसीयू विभाग कार्यरत आहेत. रोज शस्त्रक्रियाही होत आहेत, परंतु ऑक्सिजनपुरवठा कमी होत असल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपचारात अडचणी
कोरोनामुळे ऑक्सिजन सिलिडर्संना मागणी वाढली आहे. परिणामी, खासगी हॉस्पिटल्सना सिलिंडर्सचा तुटवडा भासू लागल्याने इतर आजारांच्या रुग्णांवरील उपचारात अडचणी येत आहेत.
- डॉ. चंद्रशेखर देसाई, गडहिंग्लज
24 तासांत 55 ते 60 सिलिंडर
कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, त्यात 50 वर्षावरील व इतर व्याधीग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. एकट्या कोरोना रुग्णालयासाठी 24 तासाला 55 ते 60 सिलिंडरची आवश्यकता भासत आहे. संबंधित वितरकाकडे येणारे सर्व सिलिंडर या एकाच ठिकाणी लागत असल्याने खासगी दवाखान्यांना पुरवठ्यासाठी त्याच्याकडे सिलिंडरच शिल्लक नसतात. केवळ काम चालावे म्हणून एक-दोन सिलिंडर खासगी दवाखान्यांना देत असल्याचेही या वितरकाने सांगितले.
रिकामे सिलिंडर्स भरून द्या
कोल्हापूर, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित एमआयडीसी, बेळगाव, इचलकरंजी येथून सिलिंडर्स रिफिलिंग करून मिळतात. तेथूनही मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने वितरकांचीही अडचण झाली आहे. दरम्यान, काही वितरकांकडे रिकामे पडून असलेले सिलिंडर्स भरून देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केल्यास आवश्यकता असेल तेथे पुरवठा करणे सोयीचे होईल. काही खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णसंख्या व ऑपरेशन्स रोडावल्याने ऑक्सिजनची मागणी घटली असली तरी कोरोनामुळे सिलिंडरची मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे.
दृष्टिक्षेप
- गडहिंग्लजमध्ये वितरक संख्या : 3
- दर महिन्याला लागणारे सिलिंडर्स : 1200 ते 1500
- रोजची गरज : 40 ते 50 सिलिंडर्स
- कोरोनामुळे नियमितपेक्षा मागणीत दुप्पटीने वाढ
- सद्य:स्थितीत रोज 100 सिलिंडर्सही कमी पडताहेत
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.