पॉलिटेक्‍निक, फार्मसी प्रवेशासाठी यंदा दोनच फेऱ्या 

दीपक कुपन्नावर  
Sunday, 6 December 2020

सोमवारी (ता. 7) कच्ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यावर 10 डिसेंबरअखेर हरकत घेण्याची मुदत आहे

गडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्‍निक, पदविका औषध निर्माणशास्त्र (डी. फार्मसी) प्रथम आणि थेट व्दितीय वर्ष प्रवेशाच्या यंदा दोनच फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना, मराठा आरक्षणाचा पेच यामुळे यंदा प्रवेशप्रक्रिया लांबल्याचा हा परिणाम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दोन फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे विकल्प भरताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. 

सोमवारी (ता. 7) कच्ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यावर 10 डिसेंबरअखेर हरकत घेण्याची मुदत आहे. 12 डिसेंबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 12 ते 14 डिसेंबरअखेर अभ्यासक्रम व संस्था निवडीसाठी पसंतीक्रम भरण्याची पहिली फेरी आहे. 

केंद्रीय पद्धतीने पॉलिटेक्‍निक, डी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. कोरोनामुळे यंदा दहावीचा निकाल उशिरा लागला. त्यामुळे दोन महिने उशिरा 10 ऑगस्टपासून आँनलाईन http://poly20.dtemaharashtra.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 

त्यातच मराठा आरक्षणाचा पेच झाल्याने ही प्रवेशप्रक्रिया दोन महिने लांबली. बारावी, आयटीआय, व्होकेशनल उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट व्दितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. त्यासाठी शनिवारअखेर अर्ज सादर करण्याची संधी मुदत होती. शुक्रवारी पहिल्या फेरीसाठी प्रवर्गानुसार उपलब्ध असणाऱ्या संस्थानुसार जागांचा तपशील जाहीर होणार आहे. 

मुळातच यंदा कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. दरवर्षी जून ते ऑगस्टअखेर ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणीक कामकाजाला सुरवात होते. तर डिसेंबर- जानेवारीमध्ये पहिल्या सत्राची परिक्षा होत होत्या. मात्र, यंदा डिसेंबर सुरू झाला तरी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दोनच फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना विचारपूर्वक विकल्प भरावे लागणार आहेत. पहिल्या फेरीला पूर्वीसारखाच पहिला विकल्प सक्तीचा राहणार आहे. 21 डिसेंबरपासून या वर्षीच्या प्रथम वर्षाच्या नियमित वर्गांना सुरूवात होण्याची शक्‍यता आहे. शासकीय आणि अनुदानीत संस्थातील रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर वाढीव फेरी अपेक्षित आहे. 

हे पण वाचा ऑल इंडिया चँपियन पैलवान नामदेव पाटील यांचे निधन 

विकल्प फेरीचे सविस्तर वेळापत्रक 

फेरीचे स्वरूप कालावधी 
*पहिली विकल्प फेरी 12 ते 14 डिसेंबर 
*पहिली विद्यार्थ्याचीं यादी 16 डिसेंबर 
*संस्था प्रवेशासाठी मुदत 17 ते 19 डिसेंबर 
*दुसया फेरीसाठी रिक्त जागांचा तपशिल 20 डिसेंबर 
*दुसरी विकल्प फेरी 21 ते 22 डिसेंबर 
*दुसरी यादी 24 डिसेंबर 
*संस्था प्रवेशासाठी मुदत 25 ते 28 डिसेंबर 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only two rounds this year for polytechnic pharmacy admission