पाटणेतील उच्च शिक्षीत  तरूणाने फुलवली सेंद्रीय शेती 

डी. आर. पाटील
Friday, 25 December 2020

पाटणे (ता. शाहूवाडी) येथील उच्च शिक्षित तरुण आनंदा पाटील यांनी शेतीत सतत नवनवीन प्रयोग, धडपड, शिकाऊ वृत्ती, सातत्य आणि योग्य व्यवस्थापन करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

कोल्हापूर : पाटणे (ता. शाहूवाडी) येथील उच्च शिक्षित तरुण आनंदा पाटील यांनी शेतीत सतत नवनवीन प्रयोग, धडपड, शिकाऊ वृत्ती, सातत्य आणि योग्य व्यवस्थापन करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. 
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आनंदाची घरची परिस्थिती बेताची. आई-वडील अशिक्षित शेतकरी तरीही इतिहास विषयातून एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यातर्फे झालेली सहाय्यक प्राध्यापक पदाची (सेट) परीक्षा उत्तीर्ण केली. शेतीत एकही मजूर घेतला जात नाही. सध्या सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करून नवा मार्ग मिळविला आहे. सेंद्रिय फळबाग लागवड आणि सेंद्रिय ऊस लागवड करून त्यापासून सेंद्रिय गूळ विक्रीस उपलब्ध केला आहे. नैसर्गिक सेंद्रिय गूळ आणि चिक्कूची गोडी, चव इतकी स्वादिष्ट आहे की, लोक घरी येऊन विकत घेऊन जातात. शेतात कोणतेही रासायनिक खत, कीटकनाशक वापरले जात नाही. जमिनीची मशागत करताना त्यात शेणखत घातले जाते. आठवड्यातून एकदा देशी गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, कडधान्यांचे पीठ, जिवाणू मातीपासून जीवामृत बनवून पाण्याबरोबर दिले जाते. नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू, स्फुरद विरघळणारे जिवाणू, ऍसिटोबक्‍टर, ऍजोस्पिरिलम, बुरशीसाठी ट्रायकोडर्मा, हुमणीसाठी मेटारायझियम, बिव्हेरिया जिवाणूचा गरजेनुसार उपयोग केला जातो. किडीसाठी निंबोळी अर्क काढून त्यात गोमूत्र घालून फवारणी केली जाते. 

मसाला शेतीही 
पाटील यांच्या फळझाड बागेत क्रिकेट बॉल आणि कालीपती चिक्कू, बाणावली नारळ, जी-9 केळी, देशी केळी, हापूस, कलमी आणि तोतापुरी आंबा, वन केजी पेरू, हैदराबाद सीताफळ, रामफळ, भगवा डाळिंब, मोर आवळा, साई-सरबत्ती लिंबू, कागदी लिंबू, वेलची, तमालपत्री, कडीपत्ता, काळी मिरी आदी मसाला झाडे आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organic farming flourished by a highly educated youth from Patna