
कोल्हापूर : अचूक नियोजन आणि प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयामुळे इराणी खाणीवरील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. दिवसभरात सुमारे 1 हजार 31 गणेशमूर्तींचे विसर्जन येथे झाले. उपनगरे, पेठांतील मंडळे यांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन खाणीवरच करण्यात आले.
महापालिकेने सर्वच मंडळांना मिरवणूक न काढता गणेश विसर्जन करावे, असे आवाहन केले होते. सर्वच मंडळांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. बहुतांश मंडळांनी सकाळच्या सत्रातच कुंडांमध्ये मूर्तींचे विसर्जन केले. अन्य मंडळांनी इराणी खाणीत मूर्ती विसर्जित केली. कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात श्रींची मूर्ती येथे आणली. महापालिकेने विसर्जनाची जय्यत तयारी केली होती. इराणी खाणीला चारही बाजूंनी कापड लावून बंदिस्त केले होते. मंडळातून मूर्ती आणण्यासाठी महापालिकेने टेम्पोची व्यवस्थाही केली होती. खाणीत मूर्ती नेण्यासाठी तराफेही होते. रात्रीही विसर्जन करता यावे, यासाठी हॅलोजन दिवे लावण्यात आले होते. मूर्तींची संख्या लक्षात घेऊन शेजारच्या खाणीतही विसर्जनाची व्यवस्था केली होती. मूर्ती खाणीत नेण्यासाठी लिफ्टची सुविधा होती. संध्याकाळी मूर्तींचा ओघ वाढला. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पेट्रोल पंप ते क्रशर चौक हा रस्ता बंद करण्यात आला होता.
व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे तसेच त्यांचे सुमारे दोनशे जवान, महाराष्ट्र रेस्क्यू फोर्सचे सुनील नाईक, राजर्षी शाहू रेस्क्यू फोर्सचे अमर पाटील, "जनहित' चे संभाजी सूर्यवंशी, पास रेस्क्यू फोर्सचे गजानन सुतार, हेल्पिंग हॅन्डचे नीलेश तवंदकर, जीवनज्योतचे सुनील जाधव, झेड रेस्क्यू फोर्सचे तुषार तुपे यांच्यासह माथाडी कामगारांनी या कामी योगदान दिले. यावेळी पोलिसांचा खडा पहारा होता.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे सुमारे ऐंशी कर्मचारी, आश्पाक आजरेकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, तसेच उपशहर अभियंता रमेश मस्कर यांची टीम तैनात होती.
करून दाखवलं
सायंकाळी रंगबिरंगी कारंजाच्या सान्निध्यात मूर्ती विसर्जनास सुरवात झाली. तराफे ओढण्यासाठी स्वयंसेवकांना कसरत करावी लागत होती. मूर्ती विसर्जित होईपर्यंत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागत होता. मूर्ती एकदा पाण्यात पडली की, "मोरया' असा गजर झाला आणि स्वयंसेवकांचा तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. कोणतीही धावपळ नाही, गडबड नाही. जे ठरलं ते करून दाखवलं, असेच वर्णन यंत्रणेचे करावे लागेल. मंडळांनी दान केलेले टेम्पो एकामागून एक होते. त्यांतील मूर्ती खाली उतरून घेणे, ती विसर्जित करणे, नंतर टेम्पो तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग असे नियोजन होते. इराणी खाणीलगत असलेल्या खाणीत क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.