esakal | कोरोनामुक्तीचे साकडे: श्री अंबाबाई दर्शनासाठी तीन दिवसांत २५ हजारांवर भाविक; यांना प्रवेश नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Over 25000 people in three days for kolhapur ambabai temple visit

श्री अंबाबाई दर्शन; आठ दिवसांनंतर दर्शनाची वेळ वाढणार

कोरोनामुक्तीचे साकडे: श्री अंबाबाई दर्शनासाठी तीन दिवसांत २५ हजारांवर भाविक; यांना प्रवेश नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर सोमवारी भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या कोरोना योद्ध्यांना प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज सात ते आठ हजार याप्रमाणे तीन दिवसांत २५ हजारांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. मंदिराच्या पूर्व दरवाजावर दर्शन मंडप उभारला असून येथे सॅनिटायझेशन आणि थर्मल स्कॅनिंगची सुविधा आहे. 

दरम्यान, लॉकडाउनमुळे नवरात्रोत्सव काळातही अंबाबाई मंदिर बंद राहिले; मात्र आता मंदिर खुले झाल्याने देशभरातून भाविक दाखल होऊ लागले आहेत. सध्या सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी चार ते सात या वेळेतच दर्शन दिले जात असून बाहेरील भाविकांसाठी ऑनलाईन बुकिंगची मोफत सुविधा देवस्थान समितीतर्फे उपलब्ध केली जाणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजले असून फुलांच्या कमानीही उभारल्या आहेत. पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश दिला जात असून सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दर्शन रांगेत भाविकांना काही आरोग्यविषयक तक्रारी निर्माण झाल्या किंवा कोरोना संशयित आढळल्यास त्यांना तत्काळ दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात आहे. त्याशिवाय बाहेरील पर्यटक भाविकांचे प्रमाणही हळूहळू वाढले असून बिंदू चौकातील वाहनतळ हाउसफुल्ल होऊ लागला आहे. 

सध्या यांना प्रवेश नाही...
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठांसह गर्भवती महिला आणि दहा वर्षांखालील मुलांना सध्या श्री अंबाबाई मंदिरासह देवस्थान समितीच्या अखत्यारीतील तीन हजार ४२ मंदिरांत प्रवेश नाही. आणखी आठ दिवसांनंतर दर्शनाची वेळ हळूहळू वाढवली जाणार आहे. सध्या दिवसातील सहा तास दर्शन सुरू आहे. आठ दिवसांनंतर ते दिवसातून दहा तास केले जाण्याची शक्‍यता आहे.

सोमवारपासून ऑनलाईन बुकिंग
परगावच्या भाविकांना दर्शनासाठी देवस्थान समितीतर्फे ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोमवारी (ता. २३) याबाबतच्या अधिकृत लिंक्‍स समितीतर्फे भाविकांना दिल्या जाणार आहेत.

कोरोनामुक्तीचे साकडे
आठ महिन्यांनंतर भाविकांना प्रत्यक्ष देवीचे दर्शन घडू लागले आहे. त्यामुळे लवकरात लवकर देश कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे त्यांच्याकडून घातले जात असून मास्क न घालणाऱ्या भाविकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

संपादन- अर्चना बनगे