कोल्हापुरच्या बालचित्रकारांची चित्रे जाणार आता मंत्रालयात

संभाजी गंडमाळे
Sunday, 24 January 2021

बालिका दिनानिमित्त आजपासून स्नेहा व सोहन नागेश हंकारे यांच्या चित्र प्रदर्शनाला प्रारंभ झाला

कोल्हापूर : येथील कोल्हापूर आर्ट फाउंडेशन संस्थेतर्फे बालिका दिनानिमित्त आजपासून स्नेहा व सोहन नागेश हंकारे यांच्या चित्र प्रदर्शनाला प्रारंभ झाला. राजर्षी शाहू स्मारक भवनात हे प्रदर्शन असून पहिल्याच दिवशी रसिकांचा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. त्यांनी आपल्या मंत्रालयातील कार्यालयासाठी प्रदर्शनातील चित्रे खरेदी केली. त्यामुळे आता या बालचित्रकारांची चित्रे मंत्रालयात जाणार आहेत. 

स्नेहा प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आठवीत शिकते तर सोहन शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालयात तिसरीत शिकतो. लॉकडाउनच्या काळामध्ये त्यांनी प्रदर्शनातील चित्रे साकारली आहेत. प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राचार्य अजय दळवी, विजय टिपुगडे, मुख्याध्यापक माधव गोरे, उद्योजक राहुल बुधले, डॉ.मिलिंद सामानगडकर, दादा लाड, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - ज्येष्ठ खेळाडूचे अनोखे फुटबॉल प्रेम...! अँजिओप्लास्टी होऊनही जाधव यांचे खेळाडूंना मार्गदर्शन

नगरसेवक प्रविण केसरकर, शिल्पकार सतीश घाडगे, चित्रकार गजानन धुमाळे आदींनी चित्रांची खरेदी केली. चित्रकार नागेश हंकारे, सुनीता हंकारे, मच्छिंद्र हंकारे, यशोदा हंकारे व कलाशिक्षक प्रशांत जाधव यांचे यावेळी विशेष सत्कार झाले. कॅमल कंपनी आणि चित्रकार मंगेश शिंदे यांनी या बालचित्रकारांना रंग भेट दिले. राजेंद्र कोरे यांनी कोल्हापुरी फेटे बांधून सन्मान केला. 

कला विषय अनिवार्य करावा 

शालेय शिक्षणात चित्रकला हा विषय इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत अनिवार्य करावा, अशी मागणी यावेळी चंद्रकांत जोशी यांनी केली. प्रदर्शन तीस जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते आठ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. प्रदर्शनातील विक्री झालेल्या चित्रांच्या रकमेतून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मदत  दिली जाणार आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the painting exhibition of two students in kolhapur paintings went to ministry