
माध्यमांनीही या संकल्पनेला उचलून धरले. महापालिका प्रशासनानेही या उपक्रमाचे कौतुक केले.
कोल्हापूर : पंचगंगा ही जिल्ह्याची जीवनदायिनी; पण तिच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येताच शहरातील पर्यावरणप्रेमी संस्था व संघटनांकडून या प्रश्नांवर प्रबोधन आणि कृती कार्यक्रमांवर भर दिला जाऊ लागला. नदी प्रदूषणाची कारणे, जबाबदार घटक आणि नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात, अशा अनुषंगाने मग एक फिल्मच करण्याचा निर्णय झाला आणि १९९२- ९३ या दरम्यान वर्षभर विविध ठिकाणी शूटिंग झाले. एकूण शूटिंगचा विचार केला तर तब्बल वीस तासांची फिल्म झाली असती; पण एडीटींग करून ५६ मिनिटांची फिल्म तयार झाली आणि थेट महापालिका सभागृहात ती पंचवीस वर्षापूर्वी दाखवण्यात आली होती.
शहरातील पर्यावरणीय प्रश्नांवर सतत आवाज उठवण्यात येथील सजग मंडळी नेहमीच अग्रेसर राहिली. पंचगंगेचा गुदमरणारा श्वास अधिक प्रभावीपणे लोकांसमोर यावा, यासाठी फिल्मची संकल्पना ‘विज्ञान प्रबोधिनी’ संस्थेच्या माध्यमातून पुढे आली आणि उदय कुलकर्णी, उदय गायकवाड, शिवशाहीर राजू राऊत, अभिजित पाटील, बंडा पेडणेकर आदी मंडळी कामाला लागली. वर्षभर पंचगंगा नदी आणि काठावरील गावातील विविध ठिकाणचे शूटिंग घेतले. त्यातून ५६ मिनिटांची फिल्म तयार झाली आणि ती एका स्थानिक वाहिनीवरूनही प्रसारित झाली.
माध्यमांनीही या संकल्पनेला उचलून धरले. महापालिका प्रशासनानेही या उपक्रमाचे कौतुक केले. तत्कालीन महापौर राजू शिंगाडे आणि महापालिका प्रशासनाने ही फिल्म सभागृहात सर्व लोकप्रतिनिधींना दाखवण्यासाठी पुढाकार घेतला आणि ती सभागृहात दाखवली. लोकप्रतिनिधींचा त्यासाठी कमी प्रतिसाद मिळाला तरीही प्रशासनाने मात्र त्याची चांगलीच दखल घेतली आणि पुढे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवली गेली. फिल्ममधून सुचवलेल्या विविध उपाययोजनांवर भर दिला जाऊ लागला. धनाजीराव जाधव, अमरसिंह राणे या मंडळींनी पंचगंगा प्रदूषण प्रश्नांवर न्यायालयात धाव घेतली. एकूणच या फिल्ममुळे पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नांवर सर्वांगीण चर्चा सुरू झाली.
‘सकाळ’चा पुढाकार
पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नांवर झालेल्या आंदोलनांना ‘सकाळ’ने नेहमीच पाठबळ दिले; मात्र वारंवार पाठपुरावा करूनही या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, ही गोष्ट लक्षात येताच २०११ मध्ये ‘सकाळ’ने ‘चला, पंचगंगा वाचवूया’ ही मोहीम लोकसहभागातूनच हाती घेतली. नदीच्या पाण्याची तपासणी आणि एकूणच प्रदूषणाच्या अभ्यासासाठी पिरळ ते नृसिंहवाडी अशी जलदिंडी झाली. लोकसहभागातून पंचगंगा घाट स्वच्छ झाला आणि केवळ एका दिवसापुरती ही स्वच्छता मोहीम न राहता पुढे आठवड्यातून एक दिवस विविध संस्था स्वच्छतेसाठी घाटावर एकवटू लागल्या. हळूहळू ही मोहीम एक लोकचळवळच बनली. ‘एक मूठ रक्षा श्रद्धेसाठी, उर्वरित शेतीसाठी’ ही संकल्पना त्यातूनच पुढे आली आणि पुढे ती देशभरात अनुकरणीय ठरली. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीच्या ठोस उपाययोजना या लोकचळवळीमुळेच राबवल्या जाऊ लागल्या.
संपादन- अर्चना बनगे