गल्लो गल्ली हाक ! काय, येताय काय... खेकडे, मासे पकडायला ?

In Panhala taluka, we hear only one call.
In Panhala taluka, we hear only one call.

पन्हाळा : तीन महिने घरात बसून बसून कंटाळा आलाय.. त्यात जून संपत आलाय तरी पाऊस नाही..दररोज तीच तीच भाजी खावून कंटाळा आलाय..आषाढ सुरु झालायं..पुढच्या महिन्यात श्रावण महिना पाळायचाय..त्यामुळे पन्हाळा परिसरातच काय तालुक्‍यात गल्लोगल्ली एकच हाक ऐकू येतेय..चला..येताय काय खेकडे, मासे पकडायला ? 

शेजाऱ्या-पाजाऱ्या मित्रांना अगदी अगत्याचे निमंत्रण दिले जातेय. ओढयाकाठी, नदीकाठी मासे अगर खेकडे पकडण्यासाठी धडपड सुरू आहे. या दिवसात नदीत, तलावात अगर ओढयात मासे, खेकडे भरपूर प्रमाणात मिळतात... 
खेकडे, मासे चवीने खाणाऱ्यांची संख्या गावोगावी मोठी आहे. मासे पकडण्यासाठी दोन रुपयांचा गळ, प्लास्टिक दोरा, गव्हाची कणिक अगर या दिवसात कुठेही थोडेसे उकरले की जमिनीखाली भरपूर प्रमाणात मिळणारे गांडूळ आणि एखादी छडी असली की बस्स.. तर खेकडे पकडायला गवताची मोठी काडी आणि बॅटरी असली की झाले.. 

मासे पकडण्यासाठी शक्‍यतो दिवसा आणि खेकडे पकडण्यासाठी अंधाराची वेळ निवडली जाते.. मासे पकडणे तसे सोपे.. तलावाकाठी अगर ओढयाकाठी बसून छडीला दोरा बांधून आणि हुक अडकवून या हुकला कणिक अगर गांडूळ लावून पाण्यात टाकले की झाले..गळ मासे दूरवर ओढून नेण्याचा प्रयत्न करतात, आणि अनुभवी मासे पकडणाऱ्यांना आपोआप कळते..ते हळू हळू गळाचा दोरा ओढून घेतात आणि गळ घशात अडकल्याने सुटकेसाठी तडफडणारा मासा अलगद गळातून बाहेर काढून पिशवीत टाकतात. 

खेकड्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतात.. त्यासाठी खेकडयाचे बीळ शोधावे लागते.. चाहूल लागली की खेकडा बीळात घुसतो.. त्याला बाहेर काढण्यासाठी गवताची जाड काडी चिंबवून बिळात घालून हलवावी लागते.. काहीतरी खाद्य आहे असे समजून खेकडा आपल्या मोठया नांग्यानी काडी गच्च पकडतो आणि याचवेळी काडी हळूहळू बाहेर काढून खेकडयावर हाताची झडप घालावी लागते..आणि बॅटरीच्या उजेडात त्यांच्या नांग्या मोडून त्याला पिशवीत टाकले जाते. हाताची झडप खेकडयावर व्यवस्थित बसली तर ठीक नाही तर एखादे बोट खेकडयाच्या नांग्यानी फोडलेच म्हणून समजायचे..त्यामुळे खेकडे पकडणे हे काही येरागबाळयाचे काम नाही.. 

हां... पण एवढे परिश्रम करून पकडलेल्या माशांचा आणि खेकडयांचा रस्सा खव्ययाना खाताना एकदम वेगळीच मजा देवून जातो.. सर्दीच्या निमित्ताने रश्‍श्‍याच्या वाटयावर वाटया रिकाम्या होतात. घरच्या घरधनिनीला आणि पोरांबाळांनाही या निमित्ताने मेजवानी मिळते... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com