पक्ष एक व्हीप मात्र दोन, हुपरी पालिकेत विचित्र स्थिती

बाळासाहेब कांबळे
Friday, 22 January 2021

हुपरी येथील पालिकेच्या उद्या (ता. 22) होणाऱ्या विषय समिती सभापती निवडीच्या विशेष सभेसाठी भाजपतर्फे दोन व्हीप जारी झाले आहेत.

हुपरी : येथील पालिकेच्या उद्या (ता. 22) होणाऱ्या विषय समिती सभापती निवडीच्या विशेष सभेसाठी भाजपतर्फे दोन व्हीप जारी झाले आहेत. पक्षप्रतोद आपणच असल्याचा दावा करत उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे व नगरसेवक रफिक मुल्ला यांनी भाजप नगरसेवकांना वेगवेगळे व्हीप लागू केले आहेत. त्यामुळे अधिकृत व्हीप कोणाचा याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत काय घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांनी विशेष सभा बोलावली आहे. सभेत बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण समिती सभापती व सदस्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजप, ताराराणी विकास आघाडी तसेच विरोधी शिवसेना, अंबाबाई विकास आघाडीमध्ये शह काटशहाचे राजकारण सुरू आहे. 
उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांना पदावरून हटवण्यासाठी भाजप नगरसेवकांनी कंबर कसली आहे. त्यास

शिवसेना, अंबाबाई विकास आघाडी तसेच दोन अपक्षांना सोबत घेत काटशह देण्याचा चंग लठ्ठे यांनी बांधला आहे. विषय समिती निवडीचा मुद्दा पुढे येताच उपनगराध्यक्ष लठ्ठे यांनी आपणच पक्ष प्रतोद असल्याचे सांगत भाजपच्या नगरसेवकांना व्हीप काढला आहे. पक्ष प्रतोद पदावरून लठ्ठे यांची हकालपट्टी केल्याचे सांगत आपणच खरे पक्ष प्रतोद असल्याचा दावा करत रफिक मुल्ला यांनी भाजप नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे कोणाचा व्हीप मान्य केला जाणार याबाबतची उत्सुकता आहे. याचा फैसला उद्याच्या (ता.22) विशेष सभेत लागणार आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party One But Whip Two, Strange Situation In Hupari Municipality Kolhapur Marathi News