सांगलीत ये-जा करण्यासाठी आणखी महिनाभर पास

गणेश शिंदे
बुधवार, 1 जुलै 2020

लॉकडाऊनच्या काळात सांगली जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने याआधी दिलेल्या दोन हजार पासना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जयसिंगपूर : लॉकडाऊनच्या काळात सांगली जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने याआधी दिलेल्या दोन हजार पासना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच अन्यही अर्जदारांना लवकरच पास उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यामुळे खास करुन शिरोळ तालुक्‍यातील दोन हजार शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांची सांगली जिल्ह्यात ये-जा करण्याची सोय झाल्याची माहिती, माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिली. 

पाटील यांच्यासह नगरसेवक पराग पाटील, अर्जुनवाडचे माजी सरपंच विकास पाटील, संकेत मगदूम आदींना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेतली. याआधी दिलेल्या पासची मुदत संपत असल्याने या पासना 31 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्याची मागणी केली. यानंतर ही मागणी मान्य करण्यात आल्याने शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांचा रस्ता मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन तालुक्‍यातून सांगली जिल्ह्यात जाणाऱ्या शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या सोयीसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने पासची व्यवस्था केली. यातून तालुक्‍यातील दोन हजार जणांचा प्रवास सोयीचा झाला होता. 

खास करुन शिरोळ तालुक्‍यातील शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांचा मोठा संपर्क हा सांगली जिल्ह्याशी आहे. पावसाच्या तोंडावर शेतीच्या मशागतीच्या कामांवरही परिणाम जाणवला. तर तीन महिने लॉकडाऊनमुळे हातचे काम जाण्याची भिती असल्याने नोकरदारांनीही सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मागितली होती. तर जयसिंगपूरसह तालुक्‍यातील विविध गावांमध्ये व्यावसायांच्या निमित्ताने अनेक छोटे मोठे उद्योजकही अस्वस्थ होते. 

माजी आमदार उल्हास पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने पासची व्यवस्था केली. पण त्यावर 30 जुनची मुदत दिल्याने व यानंतर लॉकडाऊन उठेल या आशेवर असणाऱ्या शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांची मात्र निराशा झाली. अखेर 31 जुलैपर्यंत पासना मुदतवाढ दिल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे. 

दृष्टिक्षेप 
- 31 जुलैपर्यंत पासची मुदत वाढवली 
- अन्य अर्जदारांनाही मिळणार लवकरच पास 
- शिरोळ तालुक्‍यातील नागरिकांचा सांगलीशी मोठा संपर्क 
- लॉकडाउनमुळे शेतीच्या कामांवरही परिणाम 

कोल्हापूर

कोल्हापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pass another month go in Sangli