esakal | धक्कादायक- पाणी योजनेतच मुरतंय पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Pattankodoli grampanchyat frod in th water scheme

पट्टणकोडोली ग्रामपंचायतीत काही सदस्यांनी संगनमताने नळ पाणी योजनेतील उपसा पंपांसह वीज उपकरणांची विक्री करून ढपला पाडल्याची तक्रार केली आहे.

धक्कादायक- पाणी योजनेतच मुरतंय पाणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पट्टणकोडोली  (कोल्हापूर)  ः पट्टणकडोलीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजनेत वेळोवेळी बदललेल्या वस्तूंचा साठा 50 टनांहून अधिक अपेक्षित असताना फक्त 5 टनांची विक्री दाखवून ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे तक्रार करून न्याय न मिळाल्याने तक्रारदारांनी लोकायुक्तांकडे मागितलेल्या न्यायाला यश मिळाल्याचे तक्रारदारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

येथे पाच गावांसाठीची नळ योजना कार्यान्वित आहे. योजनेवर 2001 ते 2019 मध्ये योजनेच्या स्वउत्पन्नातून उपसा पंप आणि देखभाल दुरुस्तीसाठी 83 लाख 2 हजार 200 रुपये तर जिल्हा परिषदेच्या प्रोत्साहनपर अनुदानातून देखभाल दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 86 लाख असे 1 कोटी 69 लाख 2 हजार 200 रुपये खर्च केले आहेत.

गैरव्यवहाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी चौकशी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी आर. जी. पाटील यांची नेमणूक केली होती; मात्र चौकशी अधिकाऱ्यांनी योजनेकडील एकूण निरुपयोगी वस्तू किती होत्या. किती वस्तू विकल्या व शिल्लक किती तसेच खरोखरच त्या खराब होत्या काय हे अहवालात न सांगताच ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे ग्राह्य मानून त्यांना अभय दिले आहे. यामुळे तक्रारदारांनी लोकायुक्तांकडे लोकप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी व त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून दंडात्मक कारवाई व्हावी अशी दाद मागितली होती. त्यानुसार उपलोकायुक्त डॉ. शैलेशकुमार शर्मा यांनी सुनावणी घेऊन तक्रारदारांचे म्हणणे ग्राह्य मानून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल मागणीचे आदेश दिले आहेत. 
तक्रारदार शब्बीर मुल्लानी, विजय रजपूत, अशोक नावलगी, चंद्रकांत भोसले, शिवाजी जाधव, सुरेश पाटील यांच्यासह अनेकांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. 

किर्दीला पाच टनच 
देखभाल-दुरुस्ती व नूतनीकरणामध्ये उपसा पंप, स्टार्टर, इलेक्‍ट्रिकल पॅनेल, मेन स्वीच असे विविध प्रकारचे 50 टनांहून अधिक साहित्य असणे अपेक्षित आहे; मात्र हे साहित्य कमिटीच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीने विक्री करून किर्दीला फक्त पाच टनाचे 1 लाख 27 हजार 250 रुपये रोखीने जमा व रोखीनेच खर्च दाखवला आहे. यावरून खोटी कागदपत्रे बनवल्याचे स्पष्ट होते, असे सांगितले.