तपासणीबाबत व्यक्‍ती बघून नियम नको!

सदानंद पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम लावला तर गैरसमज होण्याची शक्यता अधिक आहे. असे प्रकारही उघड होऊ लागल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

कोल्हापूर : रेड झोनमधून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांचा स्वॅब घेणे, त्यांना संस्थात्मक अलगीकरण करणे किंवा संबंधित व्यक्‍तीचा वैद्यकीय अहवाल पाहून त्यांचे घरातच अलगीकरण करणे, जिल्ह्याबाहेर कोठे अलगीकरण झाले असेल तर कोल्हापूर जिल्ह्यात आल्यावर पुन्हा स्वॅब, वैद्यकीय तपासणी व अलगीकरण याबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्‍यक आहे. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम लावला तर गैरसमज होण्याची शक्यता अधिक आहे. असे प्रकारही उघड होऊ लागल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 

खालील तीनही व्यक्‍ती रेड झोनमधून आल्या आहेत; मात्र प्रत्येकाबाबतीत वेगळा प्रकार आणि वेगवेगळा अनुभव आला आहे. त्यामुळे रेड झोन, ऑरेंज झोन किंवा ग्रीन झोनमधून येणाऱ्या व्यक्‍तींसाठी समान नियम असणे आवश्‍यक आहे. त्याही पुढे, प्रशासनाने कितीही चांगले निर्णय घेतले तरी त्या निर्णयांची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे त्यांनीही ठरलेल्या नियमांचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. नागरिकांनीही भांबावून न जाता दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून यंत्रणेवरील ताणही कमी करणे आवश्‍यक आहे. 

प्रकरण- 1 

रेड झोन जळगाव ते थेट रंकाळा 
जळगाव या रेड झोनमधून सासरा आणि सून थेट रंकाळा येथील टाउनशिप येथे दाखल झाले. सायंकाळी पाच वाजता दाखल झालेल्या या व्यक्‍तींनी रात्री अकरा वाजता सोसायटीला माहिती दिली. माहिती कळाल्यानंतर संचालक मंडळाची धावपळ उडाली. रेड झोनमधून दोन व्यक्‍ती आल्याने करायचे काय, असा प्रश्‍न पडला. या व्यक्‍तींसोबत चर्चा केली. संबंधित व्यक्‍तींना बोलावले. यावर त्यांनी आपण सीपीआरमध्ये जाऊन आल्याचे व दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता बोलावल्याचे सांगितले. या कुटुंबाला ज्यांनी हा सल्ला दिला त्यांनी मात्र हात वर केले. यानंतर सोसायटीने संबंधित व्यक्‍तींना सीपीआर येथे जाण्यास सांगितले. सीपीआरमध्ये तपासणी करून या व्यक्‍ती पुन्हा आल्या. 

प्रकरण 2 

रेड झोनमधून थेट आयसोलेशन हाॅस्पिटलमध्ये
बेळगाव जिल्हा रेड झोन आहे. या जिल्ह्यातील अथणी येथील व्यक्‍ती कोल्हापुरात आली. प्रशासन सांगते, रेड झोनमधून येणाऱ्या लोकांची आरोग्य तपासणी सीपीआरमध्ये होणार; मात्र ही व्यक्‍ती आयसोलेशन हॉस्पिटल येथे गेली. तेथून त्यांनी होम क्‍वारंटाईन शिक्‍का मारून घेत टाउनशिपमध्ये प्रवेश केला. प्रकृती ठीक असल्याचा दाखला प्राथमिक आरोग्य केंद्रही देत आहे. तेवढ्यावरच रेड झोनमधून येणाऱ्या लोकांना घरी जाण्याची परवानगी दिली जाणार का? 

प्रकरण 3 

पुण्याहून परतल्यावर
शिवाजी पेठ येथील एक व्यक्‍ती बहीण व भाची यांना सोडण्यासाठी पुण्यास गेली. पुणे येथे ग्रीन झोनमध्ये त्यांना सोडून त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता ही व्यक्‍ती किणी टोल नाक्‍यावर आली. किणी टोलनाक्‍यावरून त्यांना सीपीआरमध्ये जाण्यास सांगितले. सीपीआर येथे थांबवून शिवाजी विद्यापीठात अलगीकरण केले. त्यांचा स्वॅब घेतला आहे. रिपोर्ट आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरण किंवा घरातच अलगीकरण करण्याचा निर्णय होणार आहे. 

उद्‌भवलेले प्रश्‍न 
किणी नाक्‍यावर सूचनांचे पालन होते किंवा नाही? 
सीपीआरमधून चुकीचा सल्ला व मार्गदर्शनाची शक्‍यता 
येणाऱ्या व्यक्‍तींकडून दिशाभूल होण्याचे संकेत 
रेड झोनमधून येणाऱ्यांचे संस्थात्मक अलगीकरण करताना भेदाभेद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People coming from other district to kolhapur