बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 'त्या' 573 जणांवर गुन्हा ; या कारणासाठी नोंदवले गुन्हे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर 9 मे पासून परराज्यात अडकलेले नागरीक बेळगाव जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली.

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 573 जणांनी क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश सर्व प्रांताधिकारी व तहसिलदार याना देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त के. एच. जगदीश हे क्वारंटाईन प्रक्रियेचे जिल्हा समन्वय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यानीच हा निर्णय घेतला आहे.

लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर 9 मे पासून परराज्यात अडकलेले नागरीक बेळगाव जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली. त्यांच्यासाठी प्रशासनाने क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले होते. या क्वारंटाईन नियमात सातत्याने बदल होत गेले. पण बदललेल्या नियमानुसार क्वारंटाईन प्रक्रिया पूर्ण करणे संबंधितांसाठी आवश्‍यक होते. जीओ तंत्रज्ञानाचा आधार घेवून क्वारंटाईन प्रक्रिया करण्यात येते. त्यासाठी एक मोबाईल ऍप्लीकेशनही तयार करण्यात आले आहे. त्यात क्वारंटाईन व्यक्तींची नोंद दररोज करावी लागते. त्यामुळे क्वारंटाईन झालेली व्यक्ती नेमकी कोठे आहे? हे कळते. काही जणांनी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केला आहे, पण त्यानी क्वारंटाईन प्रक्रियेचे पालन केलेले नाही. त्यामुळे अशा सर्वांचा शोध प्रशासनाने घेतला आहे. आता त्यांच्या विरोधात थेट कारवाई होणार आहे.

वाचा - काय सांगताय ! चक्क आपल्या 'लाल परीत' वाहिले जात आहेत 'हे' दगड...

क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केलेल्या जिल्ह्यातील प्रत्येकाची माहिती घेण्यात आली आहे. त्यांची तालुकानिहाय यादी तयार करून ती तहसिलदार व प्रांताधिकाऱ्याना पाठविण्यात आली आहे. अशा लोकांचा शोध घेवून सर्वात आधी त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याचे आदेश जगदीश यानी दिले आहेत. त्यानंतर त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. या सर्वांची नावे प्रसारमाध्यामातून प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. दररोज अशा 20 लोकांचा शोध घेतलाच पाहिजे, दररोज 20 जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद झालाच पाहिजे असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केलेल्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार हे नक्की झाले आहे. प्रारंभी सर्वच राज्यातून येणाऱ्यांसाठी चौदा दिवसांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सक्तीचे होते. त्यानंतर चौदा दिवस होम क्वारंटाईन केले जात होते. त्यानंतर पाच राज्यांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सक्तीचे झाले. उर्वरीत राज्यातून आलेल्यांना थेट होम क्वारंटाईन केले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रातून येणाऱ्यांना सात दिवस व दिल्ली व तामिळनाडू येथून येणाऱ्यांना तीन दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सक्तीचे झाले. आता केवळ महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी इनस्टिट्‌यूशनल क्वारंटाईन सक्ती आहे. उर्वरीत सर्व राज्यांमधून आलेल्यांना थेट होम क्वारंटाईन केले जात आहे.

क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केलेल्यांची तालुकानिहाय संख्या-
बेळगाव शहर-76, बेळगाव तालुका-103, हुक्केरी-55, खानापूर-54. बैलहोंगल-28, सौदत्ती-15, रामदूर्ग-11, गोकाक-45, मुडलगी-13, अथणी-37, कागवाड-16, चिकोडी-30, निपाणी-48, रायबाग-24, कित्तूर-18


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: persons entering Belgaum district have violated quarantine rules and a case has been registered against