अरेच्चा... फोटो क्लिक नंतरच मिळणार शिवभोजन थाळीचा लाभ...

सुधाकर काशीद
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

दहा रुपयात मिळणाऱ्या या शिव भोजन थाळी चा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाचे छायाचित्र रोजच्या रोज या ऍपवरून पाठवावे लागणार आहे. शिवभोजन थाळीचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने पहिल्यांदा लाभार्थ्याचे छायाचित्र घ्यायचे मग त्याला थाळी द्यायची अशी रचना करून देण्यात आली आहे.

कोल्हापूर - शिवभोजन थाळीचा लाभ कोणी घेतला, कसा घेतला याचा पुरावा म्हणून मोबाईलवरच्या शिवभोजन ऍपवर मोठी जबाबदारी पडणार आहे. दहा रुपयात मिळणाऱ्या या शिव भोजन थाळी चा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाचे छायाचित्र रोजच्या रोज या ऍपवरून पाठवावे लागणार आहे. शिवभोजन थाळीचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने पहिल्यांदा लाभार्थ्याचे छायाचित्र घ्यायचे मग त्याला थाळी द्यायची अशी रचना करून देण्यात आली आहे. या थाळीचा लाभ घेणाऱ्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड असावे असे कोणतेही बंधन नाही. त्याचे मोबाईल वर घेतले जाणारे छायाचित्र हाच तो लाभार्थी असल्याचा महत्त्वाचा शासकीय पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. 

40 रुपयांचे अनुदान शासनाचे

येत्या 26 जानेवारीपासून शिवभोजन थाळीची ही सेवा सुरू होणार आहे. गरजूंना अवघ्या दहा रुपयांत मिळणार असली तरी या थाळीमागे प्रत्येकी 40 रुपयांचे अनुदान शासन शिवभोजनाच्या ठेकेदाराला देणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही थाळी 50 रुपयांची असणार आहे. 

वाचा - कोल्हापुरात मटणाच्या दरा नंतर आता माशांचा विषय...

ओळखपत्राची अट नाही

शिवभोजन थाळी साठी रेल्वे स्थानक, सीपीआर हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व महालक्ष्मी धर्मशाळेत केंद्र असणार आहे. थाळी 10 रुपयात असली तरी प्रत्येक केंद्रावर साधारण 150 थाळीच उपलब्ध असणार आहेत. जो प्रथम येईल त्याला प्राधान्य या पद्धतीने ही थाळी देण्यात येणार आहे. ही थाळी गरजू व्यक्तीनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आधार कार्ड, पिवळे रेशन कार्ड, ओळखपत्र असली अट नाही. मात्र खरोखरच ज्याच्याकडे जादा पैसे नाहीत अशांना यावे असा संकेत असून तो लाभार्थ्याने पाळावयाचा आहे. 
शिवभोजन थाळीत दोन चपाती, भाजी, भात व आमटीचा समावेश आहे. लोणचे, पापड द्यायचे की नाही हे ठेकेदाराला परवडत असेल तर त्याने द्यावयाचे आहे अन्नपदार्थांच्या यादीत भाजी, चपाती, भात, आमटी याचा समावेश आहे. 

शिवभोजन ऍपवर लोड केला जाणार लाभार्थ्याचा फोटो

शिवभोजन थाळीची वेळ दुपारी 12 ते 2 एवढीच आहे. ही थाळी केंद्रावरच बसून खायची आहे. पार्सल सुविधा अजिबात नसणार आहे. या केंद्रावर एखादी व्यक्ती जेवणासाठी आली की पहिल्यांदा त्याचा मोबाईल वर फोटो घेण्यात येणार आहे. तो शासनाच्या शिवभोजन ऍपवर लोड केला जाणार आहे. जेवढ्या लोकांचे यावर फोटो तेवढ्यात थाळीचे वाटप झाले असे समजून शासन या केंद्र चालकांना प्रति थाळी चाळीस रुपये अनुदान देणार आहे. फक्त सकाळी ही सेवा सुरू राहणार असून एखादी व्यक्ती त्याच दिवशी दुसऱ्यांदा लाभ घ्यायला आली तर त्याला प्रवेश नसणार आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The photo of the beneficiary of the Shiva meal plate will be sent daily from the app