सीपीआरमध्ये 8 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी, 5 जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सीपीआर रुग्णालयामध्ये आजअखेर 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे.

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयामध्ये आजअखेर 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे. यातील 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित तिघांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. 
जगातील सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरेपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रारंभ करण्यात आला. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ""मुंबई येथील रुग्णासाठी कोल्हापूर येथून प्लाझ्मा पाठविण्यात आला होता. आजअखेर कोल्हापुरातील 8 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी केली आहे. यातील 5 रुग्णांना डिस्चार्जही दिला आहे. प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर असून मुख्यमंत्र्यांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. त्याला निश्‍चितपणे कोल्हापूरमधून चांगला प्रतिसाद मिळेल.'' 

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, ""प्लाझ्मा थेरेपी कोरोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावत असून कोल्हापूर येथे रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे.'' 

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या दोघांचेही त्यांनी आभार मानले. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई येथून सहभागी झाले होते. 

दृष्टिक्षेप 
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रारंभ 
- प्लाझ्मा दान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- मुंबई येथील रुग्णासाठी कोल्हापूर येथून प्लाझ्मा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plasma therapy on 8 patients