प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवा असे ‘इकोब्रिक्‍स’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

प्लास्टिकचा होणार पुनर्वापर; अनेक वापराच्या वस्तूसाठी उपयोग

कोल्हापूर : ‘प्लास्टिक टाळा, प्रदूषण टाळा’ असा संदेश अनेक पर्यावरणप्रेमी देतात. परंतु, कोणत्या ना कोणत्या कारणांनी प्लास्टिक घरात येतेच. कधी दुधाची पिशवी, तर कधी चॉकलेट, बिस्किटांचे पुडे, कॅडबरीच्या वेष्टनातून. मात्र, हे प्लास्टिक टाळता येणारे नसते. 

प्लास्टिक टाळू शकत नाही तर पर्यावरणासाठी निश्‍चितच छोटेसे पाऊल उचलू शकतो. या विचारातून कोल्हापुरातील काही पर्यावरणप्रेमींनी इकोब्रिक्‍सचा पर्याय पुढे आणला आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच उत्पन्नाचे छोटेसे माध्यमही ‘इकोब्रिक्‍स’ उपलब्ध करून देत आहे.

बाजारातून खरेदी करून आल्यानंतर किमान ७० टक्के वस्तू प्लास्टिकच्या वेष्टनातून आणलेल्या आढळतील. त्यातील अन्नपदार्थ बाहेर काढल्यानंतर ते प्लास्टिक धुवून, स्वच्छ वाळवल्यानंतर कात्रीने त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. प्लास्टिकचे केलेले तुकडे एका बाटलीत जमा केले जातात. हे प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी सोपे जाते. भंगार वस्तू घेणारे अनेकजण बाटलीबंद केलेले प्लास्टिक विकत घेतात. यातूनच कचऱ्यात जाणाऱ्या प्लास्टिकपासून उत्पन्नाचा मार्गही खुला झाला आहे. त्यासोबतच विविधरंगी प्लास्टिकचे तुकडे बाटलीबंद असल्याने सुंदर दिसतात. काहीजण यात कल्पकता वापरत इकोब्रिक्‍सच्या उपयोगातून घरगुती वापरासाठी टिपॉय, स्टूलही बनवत आहेत.  

अनेकजण कोल्ड्रिंकची बाटली आणि चिप्स, चॉकलेटचे वेष्टन इकडे तिकडे फेकून देतात. प्लास्टिकवर बंदी असली तरी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जमा झालेले पाहतो. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणासाठी घातक ठरले जाते. अनेकजण त्याचे विघटन करण्यासाठी प्लास्टिक जाळतात. प्लास्टिक जाळल्यानंतर त्यातून मिथेन हा ज्वालाग्राही वायू तयार होतो. हे ही पर्यावरणासाठी घातक ठरते. हे टाळण्यासाठी अनेकजण इकोब्रिक्‍स संकल्पना कृतीत आणत पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

काय आहे ‘इकोब्रिक’?
‘इकोब्रिक’ एक प्लास्टिकची बाटली आहे, ज्यात सेट घनतेसाठी लागणाऱ्या प्लास्टिकने भरलेले असते. ते पुन्हा वापरण्यायोग्य बिल्डिंग ब्लॉक्‍स म्हणून काम करतात. इकोब्रिक्‍सचा वापर फर्निचर, बागेच्या भिंती आणि इतर रचनांसह विविध वस्तू तयार करण्यासाठीही केला जाऊ शकतो.

कितीही नाही म्हटले तर थोड्या फार प्रमाणात प्लास्टिक जमा होतेच. मोरेवाडी परिसरात प्लास्टिक जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. यातूनच प्लास्टिक विघटनाची माहिती इंटरनेटवरून घेतली. ही संकल्पना घरी करून पाहिली. माझ्या मैत्रिणींनाही सांगितली. त्यांनीही प्रत्यक्षात आणून पर्यावरण संवर्धनासाठी बळ दिले आहे.
- तृप्ती देशपांडे

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic recycled informative story kolhapur