वाहतूक समस्या सोडविण्यासाठी इचकरंजीत व्यासपीठ

पंडित कोंडेकर
Wednesday, 13 January 2021

पोलिस व नगरपालिका यांच्या माध्यमातून कॉमन ड्राइव्ह राबवून वाढणाऱ्या अतिक्रमणांवर आळा घातला जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणणाऱ्या चिकन 65 हात गाड्यांवर निर्बंध आणले जातील

इचलकरंजी : पोलिस व नगरपालिका यांच्या माध्यमातून कॉमन ड्राइव्ह राबवून वाढणाऱ्या अतिक्रमणांवर आळा घातला जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणणाऱ्या चिकन 65 हात गाड्यांवर निर्बंध आणले जातील. वाहतूक समस्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करू, असे अपर पोलिस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड यांनी सांगितले. 

रोटरी क्‍लब येथे झालेल्या वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. "सकाळ' ने इचलकरंजीतील बेशिस्त वाहतुकीबाबत लेखमाला प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन वाहतूक सुरळीत करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. धोरणात्मक निर्णय बाजूला ठेवून बांधकाम परवाना, अवजड वाहतूक, बेशिस्त सिग्नल यंत्रणा यावर समन्वयाने नियंत्रण आणा, अशा सक्त सूचना प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतुकीत बदल अपेक्षित असल्याचे मत नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी मांडले. नव्या वाहतूक आराखड्याची प्रायोगिक तत्त्वावर दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी आक्षेप पाठवावेत. त्यानंतर अंतिम अधिसूचना निघेल, असे पोलिस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी सांगितले. 

शहरातील वाहतूक समस्यांचा पाढा नागरिकांनी मांडला. विविध सामाजिक संघटना, मालवाहतूक संघटना, फेरीवाला समिती, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन यासह उपस्थितांनी भूमिका मांडत नाराजी स्पष्ट केली. ओव्हरलोड व अवजड वाहतुकीच्या प्रश्‍नावर चर्चा निष्फळ ठरली. यावरील ठोस निर्णयाअभावी ओव्हरलोड व अवजड वाहतुकीच्या प्रश्‍नासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत वाहतुकीबाबतची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासह वाढत्या अतिक्रमणांवर वेळीच नियंत्रण आणले जाईल, असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. बैठकीस पोलिस निरीक्षक प्रकाश निकम, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, एस. टी. आगार वाहतूक नियंत्रक सुवर्णा वड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

फळ मार्केट स्थलांतरबाबत वाद 
शॉपिंग सेंटर ते व्यंकटराव हायस्कूल या मार्गावर फळ विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता फळ मार्केट हलवण्याची मागणी काहींनी केली, मात्र यास फेरीवाला समितीतील प्रतिनिधींनी विरोध दर्शवला. बैठकीत काही काळ या मुद्द्यावर तोडगा निघत नसल्याने वादाचे चित्र निर्माण झाले. यासाठी पालिकेच्या फेरीवाला समितीच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. 

बैठकीतील निर्णय 
- बेवारस वाहनांवर ड्राइव्ह 
- प्रवासी वाहने पार्किंगवर निर्बंध 
- फूटपाथवरील अतिक्रमणे काढणार 
- गरजेच्या ठिकाणी पांढरे पट्टे 
- चौका चौकांतील वाहतुकीवर नियंत्रण 
- मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त 
- अनधिकृत फूटपाथ हटाओ

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Platform For Troubleshooting Road Traffic In Ichalkaranji Kolhapur Marathi News