तब्बल शंभर दिवसांपासून बंद असलेली क्रीडागंणे, व्यायामशाळा कधी होणार सुरु...?

युवराज पाटील
बुधवार, 8 जुलै 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला.

शिरोली पुलाची (कोल्हापूर) - तब्बल शंभर दिवसांपासून क्रीडागंण व व्यायामशाळा बंद असल्याने, क्रीडा सराव ठप्प आहे. कोरोना संकट कधीपर्यंत असणार सांगता येत नाही, तोपर्यंत आम्ही काय करावे, असा सवाल क्रीडा क्षेत्रातून होत आहे. सरावासाठी नियमावली जाहीर करून परवानगी द्यावी अशी मागणी खेळाडू व प्रशिक्षकांमधून जोर धरू लागली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेक स्पर्धा लांबणीवर गेल्या असून खेळाडूंचा सराव गेल्या शंभर दिवसांपासून बंद आहे. सरकारने विविध क्षेत्र नियमावली लागू करत, सुरु करण्यास परवानगी दिली आहे ; मात्र क्रीडा क्षेत्रासाठी कोणत्याच सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे  प्रशिक्षकांसह खेळाडूही त्रस्त झाले आहेत. खेळाचा सराव बंद असल्याने बहुतांश प्रशिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऑनलाई प्रशिक्षण शक्य नसल्याने मैदानावर सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातून होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, अनेक क्रीडा प्रकार आहेत, ज्यामध्ये दोन खेळाडूंचा थेट संपर्क येत नाही. ज्यामध्ये बॅडिमटन, नेमबाजी, टेबल टेनिस, कॅरम अशा खेळांच्या प्रकाराच्या सरावाला तरी परवानगी द्यावी, असे खेळाडू व प्रशिक्षक सांगताहेत. लवकरच आता शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची चिन्हे आहेत. अशात क्रीडा स्पर्धाही घेण्यात येतील. मात्र विना सराव थेट स्पर्धा खेळल्यास त्यांच्या प्रदर्शनावर परिणाम पडणार असून दुखापतीचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकर सरकारने आदेश व नियमावली तयार करून क्रीडा सरावाला मान्यता द्यावी, असा सूर खेळाडू व प्रशिक्षकांकडून निघू लागला आहे.

वाचा - अजित पवारांनी संभाजी राजेंना केला फोन अन् म्हणाले...

सध्या बगिचे आणि मदानावर व्यायाम, फिरणे व धावायला परवानगी असली तरी बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी आदी प्रकारातील खेळाडू मात्र शंभर दिवसांपासून घरामध्ये कोंडल्या गेले आहेत. सरावाची सवय तुटल्याने परत मैदानात आपली चमकदार कामगिरी दाखवण्यासाठी दोन महिन्यांचा सराव आवश्यक आहे. त्यामुळे नियमावली जाहीर करून सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातून होत आहे.

सराव बंद असल्याने खेळाडूंची शारिरीक तंदुरूस्ती खालावली आहे. त्यामुळे पुन्हा खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वी शारिरीक दृष्टया तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमावली जाहिर करून क्रीडागंण व व्यायामशाळा सुरू करणे गरजेचे आहे.
प्रा. दिपक पाटील, एनआयएस प्रशिक्षक, कबड्डी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the playground and gymnasium have been closed for a hundred days sports practice has come to a standstill