'ते' भेदभाव वेदनादायक ; वडील गेल्याचे दु:ख आवरायचे की लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची?

गजानन खोत 
गुरुवार, 16 जुलै 2020

या रोगामुळे आमच्या कुटुंबाची साधी विचारपूसही कोणी करू शकले नाही. ही एक सामाजिक दरी आम्ही अनुभवली.

तारदाळ (कोल्हापूर) : अफवांमुळे माणसा-माणसांमध्ये भेदभाव करण्याकडे वाढलेला कल अतिशय वेदनादायक आहे, अशा भावना कोरोनाची लागण  झालेल्या एकाच्या कुटुंबाने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केल्या. 

संपूर्ण कुटुंबच अश्रू अनावर होऊन सांगू लागले की, वडील मृत झाल्याचे दु:ख राहिले बाजूला; पण लोकांचा ससेमिरा आणि फोनवर फोन यामुळे वडील गेल्याचे दु:ख आवरायचे की लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची? यामुळे आम्ही एका वेगळ्या रोगाशी सामना करतोय की काय, असा प्रश्नच आमच्यासमोर उभा राहिला आहे. तर या रोगामुळे आमच्या कुटुंबाची साधी विचारपूसही कोणी करू शकले नाही. ही एक सामाजिक दरी आम्ही अनुभवली. गावाने वाळीत टाकल्यासारखी आमच्यात भावना निर्माण झाली, असे कोरोनाबाधिताच्या कुटुंबीयांनी सांगितले.  सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले असून मार्चपासून अद्यापपर्यंत कोरोनाच्या छायेखाली जनता जगत आहे. दोन महिन्यांत लॉकडाउन आणि शासनाचे नवनवीन आदेश यामुळे सामान्य माणसापासून सर्वांच्याच जगण्याची स्टाईल बदलावी लागत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जणच तयार झाले आहेत; परंतु चार महिन्यांत सामान्य माणसाचे जीवन अतिशय दयनीय झाले आहे. कोरोनामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होत आहे.

‘बैतुलमाल’ने जपली माणुसकी
कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कारांसाठीही माणसे मिळेनात. स्वत:च्या वडिलांना कोरोना झालेल्या एका कुटुंबाने वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने बैतुलमाल संघटनेने हे सामाजिक काम हाती घेऊन कोठेही कोरोना आजाराने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी उचलली. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून माणुसकी जपली जात आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plight of families of Corona victims kolhapur