इचलकरंजीत सोमवारचा "ड्राय डे' "रंगला' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

मोपेडमधून विदेशी दारूची वाहतूक करताना पंकज रमेशलाल गोदवाणी (सांगली रोड) याला गावभाग पोलिसांनी अटक केली

इचलकरंजी - शहरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवून मोपेड, फ्रीसह देशी-विदेशी दारू असा जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोमवारी रात्री ही कारवाई केली. 

गावभाग पोलिस ठाणे ः मोपेडमधून विदेशी दारूची वाहतूक करताना पंकज रमेशलाल गोदवाणी (सांगली रोड) याला गावभाग पोलिसांनी अटक केली. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सांगली रोडवरील हॉटेल गार्डनसमोर ही कारवाई केली. कारवाईत मोपेडसह 35 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये वेगवेगळ्या तीन कंपनीच्या विदेशी मद्याच्या एकूण 42 बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच विदेशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री करताना अमर तुकाराम बडे (योगायोगनगर) याला पोलिस उपअधीक्षकांच्या पथकांने पकडले. वैरण बाजार रोडवर सोमवारी रात्री 11 वाजता ही कारवाई केली. कारवाईत मोपेडसह 67 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोबाईलसह दोन विदेशी मद्याच्या 11 बाटल्या जप्त केल्या. 

हे पण वाचा हृदयद्रावक : वडिलांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या डॉ. राजलक्ष्मीवर काळाचा घाला ; ट्रॉलीखाली सापडून मृत्यू

 

संत मळा परिसरात देशी-विदेशी दारू विक्री करतांना दोघांना पोलिस उपअधीक्षकांच्या पथकांने पकडले. सूरज विनायक वायचळ (संत मळा) व गुरुनाथ चंद्रकांत मैंदरगी (गुरुकन्ननगर) अशी त्यांची नावे आहेत. मालक अजित चव्हाण (शाहूनगर, चंदूर) याच्यावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला. सोमवारी रात्री ही कारवाई केली. कारवाईत देशी-विदेशी दारुच्या एकूण 64 बाटल्या, 1450 रोकड, फ्रीज असा 22 हजार 973 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ड्राय डे असतांना बेकायदेशीरपणे दारू विक्री करण्यात येत होती. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकांने ही धडक कारवाई केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action on illegal alcohol selling