पोलिसांवर हल्ला करून आरोपींचे पलायन; थरारक पाठलाग करून आवळल्या मुसक्या  

शाम पाटील
Wednesday, 3 March 2021

थरारक पाठलाग करत अवघ्या दोन तासात पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या अवळल्या

शाहूवाडी (कोल्हापूर)- दोघा आरोपींना न्यायालयात नेत असताना न्यायालयाच्या आवारातच पोलिसांवर दगडाने हल्ला करून ते पळून गेलेच्या घटनेने आज येथे मोठी खळबळ उडाली. मात्र थरारक पाठलाग करत अवघ्या दोन तासात पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या अवळल्या. अलम शबीर शेख (रा.टेकोलीपैकी बांदारवाडी ता.शाहूवाडी) व बैथूल अब्दूल रहीमान शेख (रा.घाटकोपर मुंबई) अशी पळालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अलम शेख व बैथूल शेख यांच्यावर (मंगळवार ता.2) शाहूवाडी पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला होता. मद्यधुंद अवस्थेत या दोघांनी दंगा घालून तोडफोड केली होती. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना अलम याने न्यायालयाच्या आवारात गेटजवळ जाताच छातीत दुखत असल्याचा बहाणा करून खाली वाकून रस्त्यातील दगड उचलून पोलिस चिंतामणी बांबळे यांच्या डोक्यात मारला. कांबळे त्यात गंभीर जखमी झाले. हिसका देवून अलम व बैथूल यांनी यावेळी पलायन केले.

जखमी अवस्थेतही पोलिसांनी पाठलाग करून अलम शेख याला काही अंतरावर तत्काळ पकडले. मात्र बैथूल पसार होऊन चनवाड येथील शेतात घूसला. पोलिसांनी व तरुणांनी त्याचा शोध घेत शेत पिंजून काढले. त्यावेळी एका मका पीक शेतात लपलेला बैथूल शेख दिसला. पोलिस व तरूणांनी झडप घालून त्याला पकडले. शोध मोहिमेमुळे चनवाड व शाहूवाडी परिसात पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

आज दुपारी येथील पोलिस ठाण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी भेट दिली. त्या दरम्यानच आरोपी पलायनाचे हे नाटय घडले.

आपल्या गावच्या शेतातील मका पिकात पलायन केलेला आरोपी लपलाय हे समजताच चनवाड गावातील तरुण उमेश कांबळे, प्रविण पाटील, अजित चावरे, आकाश पाटील, सौरभ पाटील, साहिल पाटील, प्रतिक पाटील पोलिसांच्या मदतीला धावले. त्यांनी पोलिसांसोबत झडप घालत आरोपीला पकडले. पोलिस उपअधिक्षक आर.आर.पाटील यांनी या तरुणांना प्रत्यक्ष भेटत कौतूक केले.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested accused kolhapur shahuwadi