पोलिसांच्याच दुचाकी विम्या विना

Police Bike Without Insurance In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Police Bike Without Insurance In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : नागरिकांच्या वाहनांची तपासणी करून अपुऱ्या कागदपत्रांबद्दल दंडाची रक्कम आकारणाऱ्या पोलिस यंत्रणेतीलच कर्मचाऱ्यांच्या वाहनांचा विमा नसणे म्हणजे दिव्याखाली अंधारच म्हणावा लागेल. येथील पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी राबवलेल्या तपासणी मोहिमेत सहायक पोलिस निरीक्षकासह हवालदार, कॉन्स्टेबल यांच्या दुचाकी वाहनांचा विमा व लायसन्स नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी 11 पोलिस कर्मचाऱ्यांचे मोटरसायकल श्री. गायकवाड यांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी पोलिसांच्या वाहनांवर अशा प्रकारची पहिल्यांदाच कारवाई केली आहे. 

दुचाकीसह इतर वाहनांचा विमा, चालक परवाना आणि इतर कागदपत्रे अद्यावत असणे बंधनकारक आहे. पोलिस, वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाकडूनही याबाबत वारंवार जागृती केली जाते. शिवाय अधून-मधून तपासणी मोहिम राबवून अशा वाहनधारकांवर पोलिसांतर्फे दंडात्मक कारवाई केली जाते. नव्या नियमानुसार थेट न्यायालयात खटला पाठविण्याची तरतूद असून त्याठिकाणी दंडाची शिक्षा ठोठावली जाते.

सुलभ व सुरक्षित वाहतुकीच्यादृष्टीने वारंवार कारवाईची मोहिम राबविली जाते. विनापरवाना, विना विमा वाहन चालवणे संबंधित वाहनधारकाच्याही धोक्‍याचे आहे. यामुळे अशा कारवाईचे स्वागत आहेच. परंतु, याउलट पोलिसांची वाहने कोण तपासणार असा प्रश्‍न नागरिकांना वारंवार पडत असतो. 
या प्रश्‍नाचे उत्तर गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी कृतीतूनच दिले आहे. श्री. गायकवाड यांनी आज सकाळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनांची कागदपत्रांची तपासणी केली.

यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद यांच्यासह हवालदार पी. बी. गोजारे, बी. बी. मुळीक, आर. दोरूगडे, टी. एस. पाटील, के. एस. तडवी, व्ही. एस. पवार, कॉन्स्टेबल व्ही. बी. पाटोळे, पोलिस नाईक एन. कोळी, जे. व्ही. कांबळे, कॉन्स्टेबल डी. एन. सुकटे या अकरा पोलिस कर्मचाऱ्यांच्या दुचाकींचा विमा नसल्याचे उघड झाले आहे. या सर्वांची वाहने श्री. गायकवाड यांनी ताब्यात घेतली असून वाहनांचा विमा उतरवल्याशिवाय गाडी देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

लायसन्सही नाही 
पोलिसांकडून नेहमीच ड्रायव्हींग लायसन्स नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाते. मात्र आजच्या कारवाईत एका कॉन्स्टेबलच्या दुचाकीचा विमा तर नाहीच, शिवाय लायसन्सही नसल्याचे उघड झाले आहे, याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

कर्मचाऱ्यांच्यादृष्टीनेही धोक्‍याचे 
पोलिस कर्मचाऱ्यांना वारंवार फिरतीवर रहायला लागते. त्यांच्या वाहनांची कागदपत्रे अद्यावत असायला हवीत. म्हणून तपासणी मोहिम राबवली. यामध्ये विमा व लायसन्स नसल्याचे उघड झाले. हा प्रकार पोलिस कर्मचाऱ्यांच्यादृष्टीनेही धोक्‍याचे आहे. विमा नाही काढला तर या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोर्टात खटला पाठविला जाईल.
- प्रकाश गायकवाड, पोलिस निरीक्षक, गडहिंग्लज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com