रागातून पोलीस निरीक्षकचेच पेटवले घर अन् गाडी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

अतिक्रमण पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी काढले. त्याचा राग मनात ठेवून सुभाष देसाई याने पतंगे यांना धडा शिकवण्याचा बेत बोलून दाखवला होता. त्यावेळेपासून त्याने रॉकेलचा कॅन आणून ठेवला होता.

गारगोटी - येथील पोलीस कर्मचारी निवासस्थानातील अतिक्रमण काढल्याच्या रागातून पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या खासगी वाहनासह राहते घर पेटविण्याचा प्रकार घडला.  यात वाहन जळून खाक झाले तर घराचे किरकोळ नुकसान झाले आहे. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. याप्रकरणी संशयित सुभाष देसाई यास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

धडा शिकवण्याचा होता बेत

पोलिसांनी सांगितले की, येथील भुदरगड पोलिस निवासस्थानाच्या हद्दीत सुभाष देसाई याने अतिक्रमण केलेला दुकानगाळा  काढला होता. ते अतिक्रमण पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी काढले. त्याचा राग मनात ठेवून सुभाष देसाई याने पतंगे यांना धडा शिकवण्याचा बेत बोलून दाखवला होता. त्यावेळेपासून त्याने रॉकेलचा कॅन आणून ठेवला होता. मंगळवारी  मध्यरात्री त्याने श्री‌.पतंगे यांच्या निवासस्थानासमोरील वाहनावर रॉकेल ओतून पेटवली. बाहेरील आवाज ऐकून श्री. पतंगे बाहेर येऊन सुभाष देसाई यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

वाचा - विषय हार्ड तर ; उडव की मग हवेत बार... -

श्री.पतंगे यांचे वाहन जळून खाक झाल्याने फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. तर घराच्या हाॅलच्या काचा फोटून ज्वाला आत गेल्याने संपूर्ण हॉलमधील साहित्यास आगीच्या झळा लागून नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी अंगद जाधवर गस्तीवरून परत गेल्यानंतर काही मिनिटाच्या आत ही  घटना घडली.

त्याला घेतले ताब्यात

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय अधिकारी अंगद जाधवर, स्थानिक गुन्हा अन्वेषण निरीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक उदय डुबल यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा गारगोटीत दाखल झाला. दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास महागाव (ता. गडहिंग्लज) येथे सुभाष देसाई यास बहिणीच्या घरी ताब्यात घेतले असल्याची माहिती श्री.निवास घाडगे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police inspector's house burned down in goargoti kolhapur