तर... माझ्यावर, माझ्या सहकाऱ्यांवर त्यांनी गोळ्या झाडल्या असत्या...

policeman Namdev Yadav done grate job in kolhapur kini encounter
policeman Namdev Yadav done grate job in kolhapur kini encounter

कोल्हापूर - पोलिस नामदेव यादव यांनी दाखवलेले साहस आज कोल्हापूर पोलिस दलाच्या धाडसी वृत्तीचे प्रतीक ठरले. राजस्थानमधील हे संशयित आरोपी खतरनाक आहेत, त्यांच्याजवळ हत्यारे आहेत, हे माहीत असूनही किणी टोलनाक्‍याच्या तिसऱ्या गेटवर संशयितांची मोटार थांबताच पोलिस पथकाने या गाडीभोवती गराडा घातला. त्या क्षणी गाडीतील तिन्ही संशयित सावध झाले आणि डाव्या बाजूने दार उघडून एकाने पोलिसांवर पिस्तूल रोखत बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचा हा प्रयत्न लक्षात येताच पोलिस नामदेव यादव यांनी बाहेरून दार घट्ट धरून ठेवले.

नामदेव यादवांचे जिगरबाज साहस

हे पाहताच गाडीतील संशयिताने नामदेव यादव यांच्या दिशेनेच पिस्तूल रोखले. पलीकडे पिस्तूल घेतलेले संशयित, मध्ये मोटारीच्या खिडकीची काच आणि अलीकडे नामदेव यादव अशी स्थिती होती. त्या क्षणीही यादव यांनी प्रसंगावधान राखून आपली मान खाली घेतली व त्या ओणव्या स्थितीतच गाडीचे दार दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी संशयिताने गोळीबार केला. ती गोळी गाडीच्या खिडकीतून वरच्या बाजूला निघून गेली. पोलिसांनी आपल्याला चारही बाजूने घेरले असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्या संशयिताच्या हातात पिस्तूल होते, त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखून थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच क्षणी खिडकीतून पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गाडीत गोळ्या झाडल्या. गोळ्या पुढे बसलेल्या दोन्ही संशयितांच्या पायाला, मांडीला लागल्याने त्यांचा प्रतिकार निष्प्रभ ठरला.

त्याही परिस्थितीत चालकाशेजारी बसलेल्या एका संशयिताने सातत्याने दार उघडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला; पण नामदेव यादव, पांडुरंग पाटील या पोलिसांनी दार दाबून धरण्यात यश मिळवले. दरम्यान, खबर मिळताच किणी टोल नाक्‍यावर अगोदरच येऊन थांबलेले दुसरे पथकही धावत आले. आपल्याला चारही बाजूने घेरल्याचे तिन्ही संशयितांच्या ध्यानात आले; मात्र पोलिसांनी त्यांना गाडीतच रोखून ठेवले. काही वेळानंतर त्यांच्याकडून काही प्रतिकार होण्याची शक्‍यता नसल्याचे ध्यानात आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही संशयितांना गाडीबाहेर काढले. त्यातील दोन जखमींना छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात उपचारासाठी पाठवले व तिसऱ्या संशयिताला वडगाव पोलिस ठाण्यात तातडीने नेण्यात आले.

अन्... पाठीवर शाबासकीची थाप मारली...

घटनेत संशयितांची गाडी रोखण्यासाठी धाडसाने पुढे गेलेल्या यादव यांची २४ वर्षे सेवा झाली आहे. सध्या ते एलसीबीमध्ये कार्यरत आहेत. या घटनेत त्यांनी दाखवलेले अतुलनीय धाडस कौतुकाचा विषय ठरले. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.

कुटुंबाशी बोलून फोन केला बंद

नामदेव यादव यांनी दाखवलेल्या साहसाचे कितीही कौतुक होत असले तरी नामदेव यादव यांनी मात्र हा प्रसंग रात्री साडेअकरापर्यंत आपल्या कुटुंबाला कळू दिला नव्हता. त्यांची पत्नी सीमा, मुलगा स्वप्नील, कन्या स्वप्नाली वारंवार फोनवरून त्यांची चौकशी करत होते. स्वप्नील व स्वप्नाली दोघेही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतात. साडेअकराच्या सुमारास यादव यांनी हा प्रसंग कसाबसा आपल्या कुटुंबीयांना सांगितला व मी सुखरुप असल्याचे सांगत मोबाईल ‘स्वीच ऑफ’ केला.

गोळीबारापासून रोखले

या घटनेनंतर बराच वेळ नामदेव यादव यांना प्रतिक्रिया व्यक्त करणेही शक्‍य होत नव्हते. सुमारे तासाभरानंतर त्यांच्याशी बोलताना त्यांनी, ‘अशा प्रसंगात मला काय होईल काय, असा विचार करत मी थांबलो असतो तर आरोपीने माझ्यावर किंवा माझ्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या असत्या. त्यामुळे आरोपी गाडीबाहेर पडून त्याने बेधुंद गोळीबार करू नये, याच हेतूने त्याला गाडीत रोखून धरले,’ असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com