हुपरीत शह-काटशहाच्या राजकारणाला वेग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

येथील उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्याकडील पक्षप्रतोद पद काढून घेण्यावरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांत सुरू असलेल्या संघर्षाची धार वाढू लागली आहे. शह-काटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे. 

हुपरी : येथील उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्याकडील पक्षप्रतोद पद काढून घेण्यावरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांत सुरू असलेल्या संघर्षाची धार वाढू लागली आहे. शह-काटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे. 

पक्षप्रतोद पदावरून काढण्यासाठी भाजप नगरसेवकांची शनिवारी (ता. 6) बैठक होत असतानाच त्यास शह देण्यासाठी म्हणून खुद्द लठ्ठे यांनी उद्या (ता. 5) सकाळी भाजप नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. त्यासंदर्भात पक्षाच्यावतीने नगरसेवकांना नोटिसीद्वारे व्हीप बजावला आहे. व्हीप डावलल्यास नगररसेवकपदी अपात्र ठरवण्याची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत भाजप सत्तेवर आला. त्यावेळी भाजपचे पक्षप्रतोद म्हणून भरत लठ्ठे यांची निवड झाली. गतवर्षी जानेवारीमध्ये त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. दरम्यान, उपनगराध्यक्ष आणि पक्षप्रतोद ही दोन्ही महत्त्वाची पदे एकाच व्यक्तीकडे का? या कारणावरून भाजप अंतर्गत नगरसेवकांत धुसफूस सुरू झाली.

त्यातूनच लठ्ठे यांच्यावर राजीनाम्यासाठी नेत्यांकडून दबाव येऊ लागला आहे; पण आपली निवड पाच वर्षांसाठी असल्याचे कारण सांगत पक्षप्रतोद पदाचा राजीनामा देण्यास त्यांनी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी लठ्ठे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांना पक्षप्रतोद पदावरून काढण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी नगरसेविका ऋतुजा गोंधळी यांनी शनिवारी (ता. 6) सायंकाळी पाच वाजता भाजप नगरसेवकांची बैठक बोलावली असतानाच पक्षप्रतोद लठ्ठे यांनी उद्या सकाळी 11 वाजता भाजप नगरसेवकांच्या बैठकीचा व्हीप काढला आहे. 

पालिकेच्या राजकारणात "अण्णा' नामक नेत्यांची चलती! 
आमदार प्रकाश आवाडे ताराराणीचे, उद्योगपती महावीर गाट, अण्णासाहेब शेंडूरे व भरत लठ्ठे भाजपचे, तर दौलतराव पाटील मनसेचे नेतृत्व करतात. ही नेतेमंडळी कार्यकर्त्यांत "अण्णा' या नावाने संबोधली जातात. पालिका राजकारणात या नेत्यांच्या शब्दाला महत्त्व आहे. त्यामुळे पक्षप्रतोद घडामोडीच्या निमित्ताने पालिकेचे राजकारण "अण्णां'भोवती पुन्हा फिरू लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Conflict In Hupari Kolhapur Marathi News