अरेरे आता कळंबा तलावही...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

कळंबा तलावामध्ये सांडपाणी सोडून तलाव प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. कळंबा प्रदूषणाच्या खाईत या शीर्षकाखाली "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.

कळंबा (कोल्हापूर) ः कळंबा तलावामध्ये सांडपाणी सोडून तलाव प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. कळंबा प्रदूषणाच्या खाईत या शीर्षकाखाली "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दखल घेत आयुक्त कलशेट्टी, जल अभियंता भास्कर कुंभार, उत्तम जाधव, आरोग्य निरीक्षक राहुल राजकर, शिवाजी शिंदे, धीरज पाटील आदींनी आज तलावाची पाहणी केली.

आयुक्त कलशेट्टी म्हणाले, ""महापालिका, प्राधिकरण, कळंबा, पाचगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक घेणार आहे. तलाव परिसरामध्ये नागरी वस्ती वाढत आहे. अनेक हॉटेल, मंगल कार्यालये उभारली आहेत. त्यामुळे येथून निर्माण होणारे सांडपाणी तलावात मिसळत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या बांधकामांचा सर्वे करण्यात येणार आहे. या बांधकामांमुळे तलावाचे प्रदूषण होत असेल तर त्याबाबत योग्य निर्णय घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तलावासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असून तलावाची स्वच्छताही करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.''

मांडल्या व्यथा 
सरपंच सागर भोगम, ग्रामपंचायत सदस्य अरुण टोपकर, रोहित मिरजे, प्रकाश टोपकर यांनी आयुक्त कलशेट्टी यांच्याकडे नेमके वास्तव मांडले. महापालिकेकडे तलावाची मालकी गेल्यापासून एकही कर्मचारी तलावाकडे फिरकलेला नाही. स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक नागरिक मद्यप्राशन करून गैरकृत्ये करत आहेत. 
यावेळी सुधीर पाटील, श्रीकांत पाटील, रोहित तिवले, मयूर तिवले, गुरुप्रसाद गौड, साळोखे यास ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution in Kalamba tank