कोल्हापूर ; पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

केवळ निरीक्षण आणि मेहनत या जोरावर त्यांनी उत्पादन तंत्रातील बारकावे आत्मसात केले.

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक दिलीप केशवराव जाधव यांचे आज दुपारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात भाऊ उद्योजक राजेंद्र जाधव, पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रातील कल्पक आणि उद्यमशील व्यक्तिमत्न हरवल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यशस्वी उद्योजक केशवराव जाधव यांच्या निधनानंतर कारखान्याची सर्व जबाबदारी दिलीप जाधव यांच्यावर आली. केवळ निरीक्षण आणि मेहनत या जोरावर त्यांनी उत्पादन तंत्रातील बारकावे आत्मसात केले. अवतीभवती सुरू असणाऱ्या यांत्रिकीकरणातील बदलांचा वेध घेऊन त्यांनी शेतीमध्ये उपयोगी पडणारी अवजारे बनण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपल्या कारखान्यात स्वतंत्र रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभाग सुरू केला. येथे रात्रीचा दिवस करून त्यांनी विविध अवजारांचे आराखडे तयार केले. दोन व तीन फाळी पलटी नांगर, हायड्रोलिक ऑपरेटेड पल्टी नांगर, स्वयंचलीत पेरणी यंत्र, ऊस भरणी औजार, रोटर, ओढता डिस्क हॅरो, गादी वाफा यंत्र, बैली नांगर, सायकल कोळपा इत्यादी प्रकारची सुमारे 100 विविध प्रकारची उत्पादने त्यांनी बनवली.

शेतीसाठी उपयुक्त आणि हाताळण्यास सोपी असणारी ही अवजारे लोकप्रिय ठरली. त्यांनी अवजारांच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली. महाराष्ट्रासह परप्रांतातही त्यांच्या अवजारांची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली. दूरदृष्टी आणि मेहनतीवर त्यांनी पॉप्युलर हा ब्रॅंड विकसीत केला. मॅकसिको देशाने त्यांना "इंटरनॅशनल डायमंड स्टार फॉर क्वालिटी ऑर्डर' या पुरस्काराने सन्मानीत केले. या शिवाय महाराष्ट्र शासनाने त्यांनी गुणी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत केले. कोल्हापूर महापालिकेने दिलीप जाधव यांना कोल्हापूर भूषण पुरस्काराने गौरवले. या मानाच्या पुरस्कारांव्यतिरिक्त त्यांना अन्य पुरस्कारांनीही पुरस्कृत केले गेले. 

हे पण वाचा - कहर सुरूच ; कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 25 कोरोना पाॅझिटिव्ह... 

हे पण वाचा - 'ती' टोळधाड कर्नाटकच्या उंबरठ्यावर, कृषी विभाग झालंय सज्ज... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popular Steel Works v owner Diliprao Jadhav pass away