
गडहिंग्लज शहरात कंटेनमेंट झोन कडक करावे लागणार आहे. पॉझीटीव्ह रूग्णाची संबंधित संपूर्ण गल्ली यापुढे कंटेनमेंट झोन म्हणून असेल.
गडहिंग्लज : शहरात कंटेनमेंट झोन कडक करावे लागणार आहे. पॉझीटीव्ह रूग्णाची संबंधित संपूर्ण गल्ली यापुढे कंटेनमेंट झोन म्हणून असेल. या झोनमध्ये दुकाने असतील, तर संबंधित व्यापारी व त्यांच्या अस्थापनेतील कामगारांनीही स्वॅब देणे बंधनकारक आहे. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांनी आपली दुकाने सुरू ठेवायची आहेत. स्वॅब न दिल्यास या अस्थापना कंटेनमेंट झोन शिथील होईपर्यंत बंद राहतील, असा इशारा गडहिंग्लजचे प्रभारी आणि भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी आज येथे दिला.
येथील व्यापारी प्रतिनिधींशी खिलारी यांनी चर्चा केली. पालिका सभागृहात ही बैठक झाली. नगराध्यक्षा स्वाती कोरी, तहसीलदार दिनेश पारगे, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खिलारी म्हणाले, ""अनलॉकमध्ये सर्व अस्थापना सुरू झाल्या आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत दुकानदारांनी काळजी घेणे काळाची गरज आहे. दुकानात मर्यादीत ग्राहक घ्यावेत. मास्क, हॅण्ड ग्लोज वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकाकडे मास्क असेल तरच त्याला मालाची विक्री करणे आणि दुकानदाराकडे मास्क नसेल, तर ग्राहकांनी तेथे खरेदी न करणे असे ठरविले पाहिजे.
दुकानाबाहेर दोन बाय तीन आकाराचे नो मास्क-नो एंट्री, नो मास्क-नो गुडस् असे फलक लावले पाहिजेत. दर्शनी भागात फलक न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असून सात दिवस संबंधित अस्थापना सील करण्यात येईल. केवळ दुकानेच नव्हे, तर सहकारी संस्था, दवाखाने, कार्यालयांनीही असे फलक बाहेर लावणे बंधनकारक आहे. हॉटेलसमोरही चहा-नाष्ट्यासाठी गर्दी होवू नये. डिस्पोजल साहित्य वापरावे. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होईल.''
दरम्यान, यावेळी साधे मास्क विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ती प्रमाणित नसतात. केवळ नावाला हे मास्क आहेत. अशा विक्रेत्यांवर साधे मास्क विकण्यावर निर्बंध लादण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.
शासनासोबत खेळू नका
खिलारी म्हणाले, ""कोणत्याही दुकानदाराने क्षणिक मोहासाठी शासनासोबत व स्वत:च्या आरोग्याशी खेळ करू नये. स्वत:सह समाजाचे आरोग्यही आपल्या हाती आहे. निष्काळजीपणा कोणीही करू नये. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स या तीन गोष्टी पाळल्यास संसर्ग रोखू शकतो.''
आधी स्वॅब, मग एचटीसीआर
खिलारी म्हणाले, ""बरेच जण सध्या एचटीसीआरची (चेस्ट चेकअप) तपासणी करून घेत आहेत. या तपासणीला विरोध नाही. परंतु, या तपासणीतून कोविडचा रिपोर्ट मिळत नाही. यामुळे आधी कोरोनाची स्वॅब किंवा रॅपिड टेस्ट करून घेवूनच मग एचटीसीआरची तपासणी करून घ्यावी. बऱ्याच लोकांनी कोरोनाचा आरोग्य विमा उतरविला आहे. कोविड टेस्ट रिपोर्ट असेल तरच विम्याचा लाभ मिळू शकतो.''
संपादन - सचिन चराटी