हुपरी पालिका नगरसेवकपदी प्रतापसिंह देसाई 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

पालिकेतील दोन स्वीकृत नगरसेवकांपैकी भाजप व ताराराणी आघाडीकडे प्रत्येकी एक जागा आहे

हुपरी : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रतापसिंह अप्पासाहेब देसाई यांची निवड झाली. पालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन विशेष सभेत ही निवड केली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट होत्या. देसाई यांची आमदार प्रकाश आवाडे प्रणीत ताराराणी जिल्हा विकास आघाडीच्या कोट्यातून निवड झाली आहे. 

पालिकेतील दोन स्वीकृत नगरसेवकांपैकी भाजप व ताराराणी आघाडीकडे प्रत्येकी एक जागा आहे. देसाई हे ताराराणी आघाडीचे पालिकेतील आतापर्यंतचे तिसरे स्वीकृत नगरसेवक ठरले आहेत. ताराराणीचे यापूर्वीचे नगरसेवक सुभाष ससे यांनी कालावधी पूर्ण झाल्याने पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे श्री. देसाई यांना संधी मिळाली. देसाई यांचे वडील अप्पासाहेब देसाई यांनी तत्कालीन हुपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा सांभाळली आहे. 

तीन वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधून श्री. देसाई यांचा अवघ्या चार मतांनी पालिकेतील प्रवेश हुकला होता. पण स्वीकृतच्या रूपाने त्यांची पालिकेत वर्णी लागल्याने समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा स्थगीत

निवडीनंतर नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, नगरसेवक सूरज बेडगे, गणेश वाईंगडे, ताराराणी आघाडीचे नेते अण्णासाहेब इंग्रोळे, सुभाष ससे, बांधकाम अभियंता जावेद मुल्ला, रामभाऊ मुधाळे, बाळासाहेब रणदिवे आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा - महाराष्ट्रात तीन सावत्र भावांचे सरकार 

संपादन - धनाजी सुर्वे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratap Singh Desai as Hupari Palika Corporator