दांपत्याची आळवणी दारातूनच : घेईल मानून अंबाबाई... आता तरी जावी रोगराई!

मतीन शेख
Friday, 23 October 2020

अंबाबाईच्या ओढीनं आलेल्या फलटणच्या दांपत्याची दारातूनच प्रार्थना

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या पश्‍चिम दरवाजात फलटणवरून आलेले दांपत्य उभा होतं. हातात पेढ्याचा बॉक्‍स. त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं; पण प्रवेश नसल्यानं त्यांची घालमेल सुरू होती. पोरगं फौजदार झाल्याबद्दल अंबाबाईला पेढे घेऊन आलेले; पण मंदिरात जाता आलेच नाही. कळसाचे दर्शन घेऊन ते परत रवाना झाले. अंबाबाईच्या ओढीनं रोज अशी अनेक दांपत्ये, भाविक भेटतात; पण दर्शनाला परवानगी नसल्याने कळसाचे दर्शन घेऊनच ते समाधान मानत आहेत. 

फलटणच्या शामराव जाधव यांचा मुलगा फौजदार झाला. आई सुमन यांनी ‘पोरगा साहेब होऊ दे’ असं साकडं अंबाबाईला घातलं होतं. त्यामुळे नवरात्रात दोघे अंबाबाईच्या दर्शनासाठी आज आले. सुमन सांगू लागल्या, ‘‘अंबाबाईला भेटायला आलोय, म्हणालो, आईसमोर आधी पेढं ठेवावं अन्‌ मग गावाला वाटावं; पण देवीची भेट काय झाली नाही. कोरोनामुळे सगळीच दारं बंद हायती. दर्शन झालं असतं तर बरं झालं असतं; पण काय करणार आता? अंबाबाईला भेटायला यायचं म्हणलं आणि लॉकडाउन झालं. आईला मी साकडं घातलेलं, ‘पोरगं साहेब होऊ दे. पहिलं पेढं तुझ्यासमोर ठेवीन.’ मंदिराला फेरा घातला; पण कुठलाच दरवाजा उघडा नाही म्हणून इथं येऊन थांबलोय.’’

हेही वाचा- पासपोर्टचा कोल्हापूर कॅम्प बंद ; कोरोनातही परदेशवारीला पसंती -

तितक्‍यात शामराव जाधव यांनी पेढ्याचा बॉक्‍स उघडला. पश्‍चिम दरवाजासमोर प्रसाद ठेवला. कमळाचे फुलही वाहिले. दोघांनी तिथूनच मनोभावे नमस्कार केला आणि ‘घेईल मानून अंबाबाई. या कोरोनाने लय हाल केलं लोकांचे. आता तरी जावी ही रोगराई’ अशी प्रार्थना करीत ते माघारी फिरले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prayers from the door of the Phaltan couple came from Ambabai stream