अन्‌ गर्भवती महिला सुखरूप घरी परतली...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

लॉकडाऊनमुळे मंगळवारची रात्र त्यांना सीपीआरमध्येच थांबून काढावी लागली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हाईट आर्मीच्या 40 जणांचे पथक कस्तुरी रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कार्यरत आहे.

कोल्हापूर - येथील व्हाईट आर्मीच्या टीमने सीपीआरमध्ये अडकलेल्या दाम्पत्याला त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोचवले. संबंधित दाम्पत्याला गावी पोचवण्यासाठीची परवानगी व्हाईट आर्मीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर या दाम्पत्याला त्यांच्या घरी पोचवण्यात आले. 

सातारा जिल्ह्यातील शेंद्रे या गावचे राजाबाबू श्रीवास्तव मुळचे उत्तरप्रदेशचे. मात्र, कामानिमित्त ते शेंद्रे येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्या पत्नी कांचन गर्भवती होत्या. काही कामानिमित्त नातेवाईकांकडे ते पत्नी आणि भावाच्या पत्नीसह गडहिंग्लजला आले होते. मात्र, सातव्या महिन्यातच कांचन यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, बाळ जगू शकले नाही.

मंगळवारी डिस्चार्ज मिळाला. पण लॉकडाऊनमुळे मंगळवारची रात्र त्यांना सीपीआरमध्येच थांबून काढावी लागली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हाईट आर्मीच्या 40 जणांचे पथक कस्तुरी रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कार्यरत आहे. या टीममधील प्रशांत शेंडे त्यांच्याशी या दाम्पत्याने संपर्क साधला. लॉकडाऊनमुळे मुळगावी जावू शकत नाही आणि ऍम्ब्युलन्ससाठी खर्च खूप सांगत आहेत. तेवढे पैसे जवळ नसल्याने काहीच करू शकत नसल्याची कैफियत श्रीवास्तव यांनी मांडली. त्यानंतर मग लगेचच पुढील प्रक्रिया सुरू झाली. पोलिस प्रशासनाची रितसर परवानगी मिळाली. कोरगावकर ट्रस्टने ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली. आमदार चंद्रकांत जाधव यांनी इंधनाचा खर्च उचलला आणि विनायक भाट, सुमीत साबळे यांनी या दाम्पत्याला ऍम्ब्युलन्समधून सुखरूप घरी पोचवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pregnant women returned home safely