गडहिंग्लजला फळभाज्या, सोयाबीनचे दर तेजीत

दीपक कुपन्नावर
Monday, 25 January 2021

सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची नवी आवक सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून वाढलेली रोपांची आवक टिकून आहे. मागणीपेक्षा आवक कमी झाल्याने फळभाज्यांचे दर वधारले आहेत.

गडहिंग्लज : येथील फळबाजारात सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची नवी आवक सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून वाढलेली रोपांची आवक टिकून आहे. मागणीपेक्षा आवक कमी झाल्याने फळभाज्यांचे दर वधारले आहेत. सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. जनावरांच्या बाजारात बर्ड फ्लूच्या गैरसमजामुळे चिकनऐवजी मटणाला मागणी वाढल्याने शेळ्या-मेंढ्याचे दर वधारले आहेत. नागपूर परिसरातून येणाऱ्या संत्र्यांची आवक कमी झाली आहे. मोसंबीची आवक असली तरी चव आंबट असल्याने खरेदीला ग्राहकांची पसंती नाही. गेल्या आठ दिवसांपासून द्राक्षांची आवक सुरू झाली असल्याचे विक्रेते अमित रणदिवे यांनी सांगितले. किलोला 70 ते 80 रुपये भाव आहे. 

सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या ऍपल बोरांची आवक कायम आहे. संत्री, मोसंबी, चिक्कू, पेरू 60 रुपये किलो आहेत. केळी 30 ते 40 रुपये डझन आहेत. स्थानिक पपईची आवक असून नगानुसार 20 ते 50 रुपयापर्यंत दर आहेत. भाजीमंडईत पालेभाज्या, कोथिंबिरीची वाढलेली आवक कायम आहे. शंभर पेंढ्यांना 300 रुपये, तर किळकोळ बाजारात एका पेंढीला 4 ते 5 रुपये असा भाव आहे.

गवार, कारली, दोडका, ढब्बू यांची आवक कमी असल्याने दर वधारले आहेत. घाऊक बाजारात दहा किलोला 300 ते 350 रुपये दर असल्याचे तालुका भाजीपाला खरेदी-विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. गाजर, मटार यांची चांगली आवक आहे. लिंबूची आवक जास्त असल्याने दर कमी आहेत. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक चांगली आहे. आज बाजार समितीत 100 हून अधिक आवक झाली होती.

बर्ड फ्लूच्या गैरसमजामुळे चिकनऐवजी मटणाला मागणी वाढल्याने शेळ्यामेंढ्यांचे दर मागणी वाढले आहेत. दीडशेहून जास्त आवक झालेल्या शेळ्या-मेंढ्यांचे 5 ते 15 हजारांपर्यंत दर आहेत. सरासरी 25 टक्के दर वाढले आहेत. टोमॅटो, कांदा, वांगी, फ्लॉवर यांच्या रोपांच्या पेंढीचा दर 20 ते 50 रुपर्यांपर्यंत आहे. सोयाबीनच्या दरात तेजी असून क्विंटलचा दर 4300 रुपये असल्याचे व्यापारी यश इंगळे यांनी सांगितले. 

मिरचीच्या बाजारात गर्दी 
मिरचीच्या किरकोळ बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली वाढली आहे. ब्याडगी 200 ते 300 तर जवारी 300 ते 500 रुपयापर्यंत किलोचे दर आहेत. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices Of Fruits And Vegetables And Soybeans Go Up In Gadhinglaj Kolhapur Marathi News