अन्यथा मोठा लढा उभारू ; प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनचा इशारा

मतीन शेख
Wednesday, 4 November 2020

सरकारने १० नोव्हेंबर अखेर आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास १२ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील

कोल्हापूर : कोरोना माहामारीत सर्व उद्योग,  व्यवसाय ठप्प झाले. परंतू सध्याच्या अनलॉक नंतर जनजीवन पुर्वरत होत आहे. संसर्गाची भीती व्यक्त करत शासनाने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे टाळे अजून कायम ठेवले आहे. यामध्येच खासगी क्लासेस देखील गेल्या सात महिन्यांनपासून बंद असल्याने क्लाससंचालक व त्यावर आधारलेले लोक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासन दरबारी निवेदन सादर करुन ही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर असोसिएेशन व भगिनी प्रायव्हेट क्लासेस टिचर असोसिऐशन यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला. मागण्यांचा विचार न केल्यास १२ नोव्हेंबरला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करु असा इशारा ही यावेळी देण्यात आला. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुभाष देसाई म्हणाले, शाळा व क्लासेस यांची सांगड शासनाने घालू नये. शाळा व कॉलेज बंद असले तरी शिक्षक व प्राध्यापकांचे पगार सुरू आहेत तसे आमचे नाही. काही अभ्यासक्रम व परीक्षेची तयारी फक्त क्लासेस मध्येच होते. ती शाळा, कॉलेजमध्ये करून घेतली जात नाही. टायपिंग, शॉर्टहॅन्डचे क्लासेस सुरू झाले आहेत. मग शैक्षणिक व स्पर्धा मार्गदर्शन क्लासेसवरच बंदी का? राजस्थान, हरियाणा इ. राज्यात ९ वी पासून पुढे क्लासेस घेण्यास अटी व शर्तीसह सरकारने परवानगी दिलेली आहे. सध्या क्लासेस सुरू करा यासाठी कित्येक पालक लेखी मागणी आमच्याकडे केलेली आहे. आता पर्यंत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, तसेच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यत ही मागणी पोहचवण्याचा प्रयत्न केला पण आमचा विषय चर्चेला जात नाही. त्यामुळे सरकारने १० नोव्हेंबर अखेर आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास १२ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. 

प्रा. अतुल निंगुरे म्हणाले, महाराष्ट्रात १ लाख क्लास संचालक आहेत. त्यात जवळपास १० लाख शिक्षक अध्यापन करतात. कोल्हापूर जिल्ह्यात २ हजार लहान मोठे क्लास संचालक व त्यांच्याकडे असणारे किमान १० हजार शिक्षक आहेत. क्लासेस हा लघू उद्योग आहे. क्लासेसची शॉप अॅक्ट नुसार शासन दरबारी नोंद आहे. जी.एस.टी. ही वसूल केला जातो. इतर उद्योग व्यवसायांना परवानगी मिळाली आहे, परंतू क्लास अजून बंद आहेत. मागील क्लासची ३० ते ५० टक्के फी बुडाली व यावर्षी तर क्लासेस सुरू झाले नाहीत. घरभाडे, लाईट बील, पाणी बील, आरोग्यावरील खर्च इ. सर्व थांबलेले नाहीत,पण उत्पन्न मात्र थांबले आहे. सध्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला आम्ही पूर्ण सहकार्य करु, त्यांनी घातलेल्या नियम व अटींनचे पालन करु पण क्लास चालकांना परवानगी मिळावी अन्यथा आम्हा मोठा लढा उभारावा लागेल. 

यावेळी भगिनी क्लासेसच्या संगिता स्वामी, शितल ढणाल, सविता जोशी, संगिता देसाई, अंकिता मांगदेकर, संजय वराळे, प्रशांत कासार, विवेक हिरवडेकर, संजय देसाई, निलेश बिरंडे, उत्तम मेठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

हे पण वाचाअजित पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

 

संघटनेच्या मागण्या 

१) इयत्ता ९ वी पासूनच्या पुढील वर्गाचे क्लासेस घेण्यास परवानगी मिळावी.

२ मार्च पासूनव्या क्लास संचालकांवचे घरफाळा, पाणी बील,वीज बील पूर्णतः माफ करावे.

३) मार्च पासून प्रत्येक क्लास चालकास दरमहा २० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Classes Teachers Association warns government