esakal | बेळगाव शहरातील रुग्णालयांना आता 'हा' परवाना सक्तीचा...
sakal

बोलून बातमी शोधा

permission

बेळगाव शहरात कोणताही व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी महापालिकेचा परवाना लागतोच. प्रत्येक व्यवसायासाठी महापालिकेने परवाना शुल्क निश्‍चित केले आहे.

बेळगाव शहरातील रुग्णालयांना आता 'हा' परवाना सक्तीचा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - शहरातील सर्व खासगी रूग्णालयांना आता महापालिकेचा व्यापार परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. कर्नाटक प्रायव्हेट मेडीकल एस्टॅब्लिशमेंट्‌स असोसिएशन या संस्थेनेही सर्व रूग्णालयांना परवाना घेण्याची सूचना केली आहे. रुग्णालयांना शासनाकडून जो परवाना दिला जातो, त्या परवान्याचे दर पाच वर्षानी नूतनीकरण होते, त्यावेळी महापालिकेच्या व्यापार परवान्याची माहिती द्यावी लागते. अन्यथा शासनाकडून नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे प्रत्येक रूग्णालयांकडून महापालिकेकडे परवान्यासाठी अर्ज दाखल केला जात आहे. 2015-16 या वर्षात बेळगाव महापालिकेनेही एक ठराव केला आहे. त्या ठरावानुसार शहरातील प्रत्येक रूग्णालयाने महापालिकेचे व्यापार परवाना घेणे आवश्‍यक आहे. पण या ठरावाची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली नव्हती. पण या वर्षापासून या ठरावाची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागात परवान्यांसाठी अर्ज वाढले आहेत.

वाचा - डॉ. तात्याराव लहाने यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार...

बेळगाव शहरात कोणताही व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी महापालिकेचा परवाना लागतोच. प्रत्येक व्यवसायासाठी महापालिकेने परवाना शुल्क निश्‍चित केले आहे. शिवाय दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. परवाना शुल्काएवढीच रक्कम नूतनीकरणावेळीही भरावी लागते. शहरातील सर्व व्यापारी आस्थापनांनी पालिकेचा परवाना घ्यावा यासाठी दरवर्षी पालिकेकडून प्रयत्न केले जातात, तरीही शहरातील निम्म्याहून अधिक व्यापारी आस्थाने पालिकेच्या परवान्याविना चालविली जात आहेत. रूग्णालयांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. अनेक रूग्णालयांनी पालिकेकडून परवानाच घेतलेला नाही. पण त्यांच्या संघटनेने व महापालिकेनेही परवान्यासाठी सक्ती केली आहे. त्यामुळे रूग्णालयांकडून परवान्यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे. रूग्णालयात उपचार करून घेतलेल्या रूग्णांपैकी काहीजण वैद्यकीय विम्यासाठी अर्ज करतात. त्यावेळी संबंधित रूग्णालयाच्या व्यापार परवान्याचा क्रमांक बिलावर नमूद करावा लागतो. त्यामुळे रूग्णालयांसाठीही आता परवाना महत्वाचा ठरू लागला आहे.

यंदा पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक रूग्णालयांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी काही अर्ज नव्या परवान्यासाठी आहेत, तर काही परवाना नूतनीकरणासाठी आहेत. पण आरोग्य विभागाने या अर्जांवर निर्णयच घेतला नव्हता. नूतन आरोग्याधिकारी डॉ. बसवराज धबाडे यानी प्रत्येक अर्जाची व्यक्तीशः स्थळावर जावून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ते अर्ज आरोग्य विभागातच पडून होते. पण दाखल झालेल्या सर्वच अर्जांची स्थळावर जावून पडताळणी करणे आरोग्याधिकाऱ्यांसाठी शक्‍य नाही ही बाब डॉ. धबाडी यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आरोग्य निरीक्षकांनी दिलेल्या पडताळणी अहवालाच्या आधारे व्यापार परवाना वितरण व नूतनीकरणाची प्रक्रिया त्यानी सुरू केली आहे.

डॉ. आर. जी. विवेकी. माजी अध्यक्ष आयएमए बेळगाव- महापालिकेचा व्यापार परवाना घेणे रूग्णालयांच्या दृष्टीने हिताचे आहे. शिवाय केपीएमईए कडूनही तशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे परवान्यांसाठी महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

go to top