दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात खासगी वाहनांना प्रवेश बंदी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

पर्यटक सुरक्षितता व जबाबदार पर्यटकांसाठी समितीने नव्या संकल्पना पुढे आणल्या आहेत.

राधानगरी - येथून पुढे दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांच्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. पर्यटकांना स्थानिक परिस्थितीकीय समितीकडून उपलब्ध होणाऱ्या वाहनातूनच अभयारण्य क्षेत्रात जाता येईल. यंदाच्या पर्यटन हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. समितीकडून यंदाच्या पर्यटन हंगामात वाहन व त्याबरोबर प्रशिक्षित गाइडची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी किफायतशीर शुल्क आकारणी होणार असून पर्यटकांच्या वाहनांसाठी दाजीपूरात वाहनतळ राहणार आहे.

पर्यटक सुरक्षितता व जबाबदार पर्यटकांसाठी समितीने नव्या संकल्पना पुढे आणल्या आहेत. यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर अभयारण्य क्षेत्रात आठवड्यातून दोन वेळा नाईट सफारी सुरू करण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी अटी व शर्ती निश्चिती करण्यात येत आहे. अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या वलवण धरणात पर्यटकांसाठी बोटिंग सुविधाही समिती सुरू करणार आहे. जखमी वन्य प्राण्यांवर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी रेस्क्यू टीम समिती निर्माण करणार आहे. पर्यावरण आणि अभयारण्याचे संरक्षण संवर्धन पर्यटनातून स्थानिकांना रोजगार या उद्देशाने समितीने नव्या उपक्रमांवर भर दिला आहे. एकूणच समितीच्या उपक्रमामुळे दाजीपुरचा यंदाचा पर्यटन हंगाम वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

 "कोरोना संकट आणि पावसाळ्यामुळे तब्बल नऊ महिने अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. मार्च महिन्यापासूनच कोरोना संकटाने पर्यटकांसाठी अभयारण्य क्षेत्रात प्रवेश बंदी झाली. पर्यटकांसाठी अभयारण्य दीर्घकाळ बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे". 

हे पण वाचावाट अडवून चालकाला केली मारहण अन् चोरला ट्रॅक्‍टर  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी आणि नियमांचे पालन करून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. वन्यजीव विभाग आणि स्थानिक समिती उपक्रमामुळे पर्यटकांना जैवविविधता, वन्यपशुपक्ष्यांची माहिती प्रशिक्षित गाईडकडून मिळेल. खासगी वाहनांना मंदीने पर्यटकांवर नियंत्रण राहील. अभयारण्य व पर्यावरणाला बाधा येणाऱ्या घटनांना पायबंद बसेल. किमान दहा वाहने पर्यटकांना जंगल सफारी साठी उपलब्ध राहतील.

-विलास पाटील, सरपंच : तथा अध्यक्ष स्थानिक परिस्थितिकी समिती दाजीपुर वलवण 

संपादन - धनाजी सुर्वे 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private vehicles banned from entering Dajipur sanctuary area