आजऱ्यात घनकचऱ्यासाठी दोन कोटींची तरतूद 

रणजित कालेकर
Friday, 26 February 2021

नगरपंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज सन 2021-22 चे अंदाजपत्रक लेखाधिकारी प्रवीण पाटील यांनी सादर केले.

आजरा : येथील नगरपंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज सन 2021-22 चे अंदाजपत्रक लेखाधिकारी प्रवीण पाटील यांनी सादर केले. यामध्ये 13 कोटी 21 लाख 32 हजार 870 इतके महसुली व भांडवली उत्पन्न अपेक्षित असून 13 कोटी 7 लाख 67 हजार इतका खर्च होणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांसाठी आठ कोटी 50 हजार, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी 2 कोटींची तरतुद करण्यात आली. 13 लाख 65 हजार 870 रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजूरी दिली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी अध्यक्षस्थानी होत्या. 

वरीष्ठ लिपीक संजय यादव यांनी स्वागत केले. अंदाजपत्रकामध्ये सन 2021-22 च्या महसुली जमा रक्कम दोन कोटी 52 लाख 38 हजार 470 इतकी अपेक्षीत आहे. महसुली खर्च रक्कम 2 कोटी 49 लाख 17 इतकी आहे. 3 लाख 11 हजार 470 रुपये इतकी रक्कम शिल्लक राहणार आहे.

10 कोटी 69 लाख 4400 रुपये इतकी भांडवली रक्कम अपेक्षीत आहे. 10 कोटी 58 लाख 50 हजार इतकी भांडवली खर्च रक्कम अपेक्षीत आहे. यामध्ये 10 लाख 54 हजार चारशे इतकी रक्कम शिल्लक राहणार आहे. त्यामुळे महसुली व भांडवली अशी मिळून 13 लाख 65 हजार इतकी शिल्लक राहणार आहे.

पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, नाले, गटारी, पाणीपुरवठा, प्रसाधनगृहे यासाठी 8 कोटी 50 हजारांचा खर्च अपेक्षीत आहे. ही अर्थसंकल्पातील सर्वात मोठी तरतुद आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 2 कोटींची तरतुद केली आहे. अग्नीशमन दलसाठी पाच लाखांची तरतुद करण्यात आली आहे. गतवर्षी पेक्षा वेतन राखीव निधीमध्ये 60 हजारांनी वाढ करून ती 7 लाखांपर्यंत नेली आहे. 

सदरच्या अर्थसंकल्पावर विशेष चर्चा झाली नाही. बहुतांश नगरसेवक व प्रमुख विभागाचे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी गाळ्यांची भाडेवाढ सुचविली. अभिषेक शिंपी यांनी महसुली उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्याविषयी सुचना केल्या. उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी सुचना मांडल्या.

घरफाळा व अन्य करवाढीतून नगरपंचायतीला यंदापासून चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे मुख्याधिकारी अजिंक्‍य पाटील यांनी सांगितले. नगरसेविका शुभदा जोशी म्हणाल्या, ""अर्थसंकल्पात बदल सुचविले, तर ते सभागृहात मंजूर केले पाहिजेत.'' शिंपी यांनी हा मुद्दा उचलून धरला. बदल मंजुर केले नाही तर चर्चेला अर्थ नसल्याचे सांगून जोशी व सलामवाडे सभागृहातून निघून गेल्या. नगरसेवक संभाजी पाटील, किरण कांबळे, अनिरुध्द केसरकर, धनाजी पारपोलकर, शुभदा जोशी, शकुंतला सलामवाडे, यासिरामबी लमतुरे, सुमैय्या खेडेकर, रेश्‍मा सोनेखान, यास्मीन बुड्डेखान आदी उपस्थित होते. 

विशेष तरतुदीची रक्कम 
दिव्यांग कल्लाण निधी, महिला व बालकल्याण विभाग, दुर्बल घटक कल्याण निधी, शिक्षण व कला क्रीडा विभागासाठी प्रत्येकी 4 लाख 50 हजार इतकी विशेष तरतुद केली आहे. एकूण 18 लाख रुपयांची विशेष तरतुद केली आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provision Of Rs. 2 Crore For Solid Waste In Ajara Kolhapur Marathi News