संचारबंदीच्या काळात पंक्‍चरवाला पण गायब...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

लॉक डाऊन 21 दिवस चालणार असल्याने तोपर्यत दुकाने बंद राहतील अशी स्थिती आहे. पंक्‍चर काढणार्याचे हातावरचे पोट, सकाळी नऊला गॅरेज उघडले तर सायंकाळी घर चालणार...

कोल्हापूर - एरव्ही गाडी पंक्‍चर झाल्यानंतर ती ढकलून पुढे नेईपर्यंत इतका दम लागतो की गाडी वाटेत सोडून जाण्याची काही वेळा इच्छा होते. दूर अंतरावरून गाडी ढकलत नेताना दुचाकीचालक अक्षरक्षः घाईला येतो. पंक्‍चरवाला नजरेस पडल्यानंतरच जीवात जीव येतो. सध्या लॉक डाऊनमुळे मात्र पंक्‍चरवालेही सुट्टीवर असल्याने गाडी पंक्‍चर झालीच तर ती काढायची कुठे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

लॉक डाऊन 21 दिवस चालणार असल्याने तोपर्यत दुकाने बंद राहतील अशी स्थिती आहे. पंक्‍चर काढणार्याचे हातावरचे पोट, सकाळी नऊला गॅरेज उघडले तर सायंकाळी घर चालणार अशी स्थिती.अनेक बेरोजगार तरूणांनी पंक्‍चर काढण्याची कला आत्मसात करून उदरनिवार्हाचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. संचारबंदीच्या निमित्ताने पंक्‍चरची दुकाने बंद झाली आहेत. सकाळी नऊपासून या दुकानात हवा भरण्यापासून ते पंक्‍चर काढण्यासाठी वाहनचालक गर्दी करतात. हल्ली सायकल मध्ये हवा मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दुचाकी गाडयांची संख्या इतकी आहे की तासाला किमान दोन दुचाकी तरी पंक्‍चर काढण्यासाठी येतात. इनर पाण्यात बुडविणे, पंक्‍चर एकाच ठिकाणी आहे की की अनेक ठिकाणी आहे याची खात्री केली जाते. एका पंक्‍चरसाठी किमान वीस मिनिटांचा वेळ लागतो. पंक्‍चर काढेपर्यंत वाहनचालकाच्या जीवात जीव नसतो. दिवसा कुठेही पंक्‍चर काढता येते मात्र रात्री गाडी पंक्‍चर झाल्यानंतर कपाळावर आट्या पडतात. काही पेट्रोल पंपाजवळ रात्री पंक्‍चर काढण्याची व्यवस्था आहे. 

लॉक डाऊनच्या काळात रस्ते दिवसा रात्री सामसूम आहेत. दुचाकी आणि चारचाकी गाड्या रस्त्यावर येऊ नयेत असा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यातून काहीजण गाड्या आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र चूकून गाडी पंक्‍चर झाली तर आहे त्या ठिकाणी लावून जाण्याशिवाय पर्याय नाही हे ही तितकेच खरे आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The puncture repair shops are closed during the curfew in kolhapur