अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन सक्तीचे 

Quarantine is mandatory until the report is received
Quarantine is mandatory until the report is received

कोल्हापूर : रेड झोनमधून कोल्हापूरला यायचे असेल तर स्वॅब तपासणी, तपासणीचा अहवाल येईपर्यंत सीपीआर, डी. वाय. पाटील, आयसोलेशन हॉस्पिटल किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन... हे आता सक्तीचे झाले आहे. कोल्हापुरात बाहेरून येणाऱ्या लोकांतील कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठे असल्याने ही खबरदारी अनिवार्य झाली आहे. बाहेरून कोल्हापुरात आलेल्या रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत 313 वर जाऊन पोहोचली होती. 

काही दिवसांपूर्वी स्वॅब घेतलेल्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन न करता घरी पाठवून देण्यात आले होते. आणि त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती. स्वॅब घेऊनही संबंधितांना त्यांचे अहवाल येण्यापूर्वी घरी पाठवले गेले, असा संतापजनक सूर शहरातून उमटला होता. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने क्वारंटाईन कडक केले. खुद्द महापालिका आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला पत्र देऊन स्वॅब घेतलेल्या लोकांना क्वारंटाईन न करता घरी का पाठवले, अशी विचारणा केली होती. 

ज्यांचे स्वॅब घेतले त्यांच्यावर सीपीआरमध्ये देखरेख, स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर सीपीआर किंवा डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, निगगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्यांना होम क्वांरटाईन किंवा रिपोर्ट येईपर्यंत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अशी यापूर्वी पद्धत होती. ती व्यवस्थित सुरू होती; पण बाहेरून येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला व ही पद्धत विस्कळीत झाली. अचानकच एके दिवशी स्वॅब घेतलेल्या लोकांना त्यांचे रिपोर्ट येण्याची वाट न पाहता होम क्वारंटाईन करून घरी पाठवण्यात आले. घरी या लोकांनी त्याचे किती पालन केले हा वेगळाच भाग; पण घरी पाठवलेल्या चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले व प्रशासनाची धावपळ उडाली. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह की निगेटीव्ह हेच माहीत नाही, त्यांना घरी का पाठवले? अशी संतप्त विचारणा शहरवासीय करू लागले. 

या घटनांची दखल घेत पुन्हा क्वारंटाईनचा नियम कडक झाला. आता रेड झोनमधून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब तपासणीसाठी घेतलाच जाणार आहे. हा अहवाल येईपर्यंत त्याला सीपीआर, डी. वाय. पाटील किंवा आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे. तेथे जागा नसेल तर स्वतंत्र इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार आहे, जेथे अहवाल आलेले व न आलेले असा संमिश्र सहवास नसणार आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना क्वारंटाईन करायचे की त्यांच्या घरी व्यवस्था असेल तर होम क्वारंटाईन करायचे, हे महापालिका यंत्रणा ठरवणार आहे. 
-- 
क्वारंटाईन कोणाला करायचे, कसे करायचे, ज्यांचे अहवाल यायचे आहेत त्यांना कोठे ठेवायचे, याचे एक धोरण आता निश्‍चित झाले आहे. आता त्यात बदल होणार नाही. ज्यांचे अहवाल यायचे आहेत, अशांना स्वतंत्र क्वारंटाईन इमारत असणार आहे. 
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका 

-- 
घरी सोडण्याच्या प्रकाराची गंभीर दखल 
ज्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते, ज्यांना अहवाल येण्यापूर्वीच घरी सोडण्याचा घडलेला प्रकार गंभीर आहे. त्याच दिवशी काही लोकांना घरी का सोडले, याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com