क्वारंटाईन व्यक्ती फिरताना सापडल्यास पाच हजारांचा दंड करणार

युवराज पाटील -पुलाची शिरोली
Tuesday, 22 September 2020

शिरोली पुलाची : क्वारंटाईन व्यक्ती फिरताना आढळल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली. 

शिरोली पुलाची, कोल्हापूर: क्वारंटाईन व्यक्ती फिरताना आढळल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली. 
येथील कोरोनाग्रस्तांची संख्या तीनशेच्या समीप पोचली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत; मात्र त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे गावात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, यांसह सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई ग्रामपंचायत, व्यवस्थापन समिती व पोलिस प्रशासनातर्फे दररोज केली जात आहे. 
स्वॅब तपासणीस दिलेल्या व्यक्तीने अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन होणे गरजेचे आहे; मात्र स्वॅब दिलेली व्यक्ती गावभर फिरत असल्याचे चित्र आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीने स्वॅब दिल्याचे समजते, तोपर्यंत त्याने गावभर कोरोनाचा प्रसाद वाटप केलेला असतो. अशा बेफिकीर व्यक्तीमुळे गावातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्ती फिरताना दिसल्यास त्याला 5 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच खवरे यांनी सांगितले. 
यावेळी उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, उत्तम पाटील, जोतीराम पोर्लेकर आदी उपस्थित होते. 

कारवाई सुरू राहणार 
गावात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे यांसह सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत ग्रामपंचायतीने 74 हजार तीनशे रुपये वसूल केले आहेत. ही कारवाई दररोज सुरू राहणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी सांगितले. 

-सपांदन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A quarantine person will be fined Rs 5,000 if found wandering