esakal | उद्योजकांसमोर कुशल कामगारांचा तुटवडा, उत्पादनावर परिणाम

बोलून बातमी शोधा

 The question of workers in front of entrepreneurs}

कसबा सांगाव, कोल्हापूर ः उद्योगातील तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता सातत्याने बदलत आहे. मात्र नव्या तंत्रज्ञानानुसार काम करणाऱ्या कुशल कामगारांची संख्या कमी असल्याने उद्योजकांसमोर संकट उभे ठाकले आहे. औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार काम करीत आहेत, मात्र कुशल कामगारांच्या मर्यादित संख्येमुळे उत्पादन निर्मितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची गरज ठळकपणे दिसून येत आहे. याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. 

उद्योजकांसमोर कुशल कामगारांचा तुटवडा, उत्पादनावर परिणाम
sakal_logo
By
कृष्णात माळी

कसबा सांगाव, कोल्हापूर ः उद्योगातील तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता सातत्याने बदलत आहे. मात्र नव्या तंत्रज्ञानानुसार काम करणाऱ्या कुशल कामगारांची संख्या कमी असल्याने उद्योजकांसमोर संकट उभे ठाकले आहे. औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार काम करीत आहेत, मात्र कुशल कामगारांच्या मर्यादित संख्येमुळे उत्पादन निर्मितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची गरज ठळकपणे दिसून येत आहे. याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. 

सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर कागल हातकणंगले एमआयडीसी स्थापन झाली आहे. चौदाशे भूखंड वाटप करण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग, फाउंड्री, टेक्‍सटाईल, गारमेंट, इलेक्‍ट्रिक, अन्न प्रक्रिया, फर्निचर, औषध निर्मिती, सूक्ष्म आणि लघु मशीन शॉप आदीसह सुमारे सहाशे व्यवसायांची नोंद औद्योगिक विकास महामंडळकडे आहे. यातील सुमारे चारशे कंपन्या सुरू आहेत. सुमारे अडीच हजार स्थानिक आणि परप्रांतीय कामगार विविध कंपन्यांत काम करीत आहेत. यामध्ये अकुशल कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानासह येणाऱ्या मशिनरीसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ अत्यंत तोकडे आहे. प्राथमिक प्रशिक्षण घेवून काम करणारे कामगार बदलत्या तंत्रज्ञानाला सहजासहजी आत्मसात करू शकत नाहीत. यामुळे नवख्या आणि शिकाऊ कामगारांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्याला कुशल कामगार बनवण्याचे काम उद्योजक आणि व्यावसायिकांना करावे लागत आहे. यामुळे वेळ, पैसा, उत्पादन आणि अर्थकारण यावर परिणाम होत आहे. 

या कुशल कामगारांची आहे कमतरता 
उद्योजकांना टर्नर, फिटर, वेल्डर, सीएनसी, वीएमसी ऑपरेटर, टेलर, विवर, मोल्डर, शॉट ब्लास्टिंग ऑपरेटर आदी कामगारांची कमतरता सातत्याने भेडसावत आहे. कुशल कामगारांची पोकळी भरून काढणे उद्योजकांना आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर परिपूर्ण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. याकरिता शासन स्तरावर तात्काळ प्रयत्न होणे अपेक्षित आहे. 

उद्योग जगतात तंत्रज्ञान बदलत आहे. मात्र त्या प्रमाणात मिळणारे प्रशिक्षण पुरेसे नाही. पारंपारीक प्रशिक्षणास आधुनिकतेची जोड देणे महत्वाचे आहे. फिनिशिंग स्कूलची संकल्पना वापरून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्याचा मॅक असोसिएशनचा प्रयत्न सुरू आहे. 
- गोरख माळी, अध्यक्ष मॅक असोसिएशन कागल.

- संपादन यशवंत केसरकर