रब्बीचा हंगाम 15 दिवसांनी लांबणार

The Rabbi Season Will Be Extended By 15 Days Kolhapur Marathi News
The Rabbi Season Will Be Extended By 15 Days Kolhapur Marathi News

चंदगड : या वर्षी परतीच्या पावसाचे शेतात तुंबलेले पाणी अद्यापही कमी झालेले नाही. त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला बसला आहे. दरवर्षी भात कापणी केल्यानंतर त्याच क्षेत्रात रब्बीच्या धान्याची पेरणी केली जायची. नोव्हेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणारी पेरणी या वर्षी डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्‍यता आहे. त्याचा उत्पादनावरही परिणाम होणार आहे. 

या वर्षी ऑक्‍टोबर अखेरपर्यंत सातत्याने पाऊस कोसळत राहिला. गेले आठ-दहा दिवस उघडीप पडल्यामुळे भात कापणी, मळणीची लगबग सुरु आहे. मोठ्या प्रणाणात कापणी-मळणीची कामे उरकली आहेत. भाताच्या याच वाफ्यात दरवर्षी शेतकरी रब्बीसाठी मसुर, वाटाणा, हरभरा, बटाटा, मिरची, ज्वारी व चारा पिके घेतात. त्यासाठी भात कापणीनंतर जमिनीची फेर मशागत करावी लागते. नांगरट, कुळवट करून शेणखताची मात्रा देऊन मग पेरणी केली जाते.

परंतु या वर्षी वाफ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने जमिनीतील ओलावा कमी होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर मशागतीची कामे उरकून पेरणी करावी लागणार आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागात मसुर हे मुख्य रब्बी पिक आहे. काळवट जमिनीतील मसुरीला बेळगाव बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

या वर्षी या जमिनीत अति पावसाने ओलावा मोठ्या प्रमाणात आहे, जो सद्य स्थितीत पेरणीला योग्य नाही. पश्‍चिम भागात सुध्दा भाताच्या वाफ्यातून पाणी साचून आहे. हे पाणी आटण्यास अजून पंधरा दिवस लागतील. त्यात मधल्या काळात पाऊस झाला तर पुन्हा अडचणच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, हंगाम लागल्यास वातावरणात होणाऱ्या बदलाचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मसुर पिकाला पहाटेचे धुके आणि थंडी उपयुक्त असते. वाटाणा, हरभरा व इतर कडधान्यालाही थंडीमुळे दाणे भरण्यास मदत होते. परंतु यावर्षी हा हंगाम साधता येणार नसल्याने शेकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. 

चंदगड तालुक्‍यातील रब्बीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
मसूर 100 
हरभरा 100 
ज्वारी 75 
बटाटा 800 
मिरची 500 
वाटाणा 75 
चारा पिके 100 

दर्जावर परिणाम होण्याची शक्‍यता
परतीच्या पावसाने जमिनीत पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे रब्बीचा पेरणीला योग्य जमीन तयार नाही. डिसेंबरनंतरच्या वातावरणाचा विचार करता पिकांच्या उत्पादनावर आणि दर्जावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 
- किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी, चंदगड 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com