राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

वीज गृहातून 4256 इतका विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे

राशिवडे बुद्रुक : गेली दोन दिवस उसंत घेतल्याने पावसाने राधानगरी तालुक्यात पुन्हा जोर वाढला आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांपैकी दोन दरवाजे आज पुन्हा खुले झाले आहेत. त्यामुळे वीज गृहातून 4256 इतका विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. दरम्यान काळम्मावाडी धरण 91 टक्के भरले आहे. यामध्ये 23 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर तुळशी जलाशयातून पाणी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी विसर्ग करण्यात येणार आहे. 
जलाशयातील तीन दरवाज्यांवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Independence Day : गणेश मंडळांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवावेत : सतेज पाटील

सतत पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर गेली तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. यामुळे तालुक्यातील तिन्ही धरणांचा पाणीसाठा नियंत्रित झाला होता. पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक विचारात घेता राधानगरी आणि काळम्मावाडी धरणातून वीज निर्मितीसाठीच फक्त विसर्ग सुरू होता. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते. आज पडलेल्या पावसामुळे दोन स्वयंचलित दरवाजे सकाळी दहा वाजता खुले झाले. परिणामी भोगावती नदी पात्रातून 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

हेही वाचा -  हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करा : धनंजय महाडिक..

काळम्मावाडी धरण 91 टक्के भरले असून यातून वीज निर्मितीसाठी 1800 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाने चांगला जोर धरला आहे. याच्या वक्राकार दरवाजातून आज सायंकाळी तुळशी नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. याच्या तीन दरवाज्यावर तिरंगी विद्युत रोषणाई करून पाण्याला भारतीय ध्वजाचा रंग दिला जाणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: radhanagari dam gate open today morning