कोवाडला पावसाने ऊस भुईसपाट 

अशोक पाटील
Wednesday, 28 October 2020

परतीच्या पावसाचा ऊस पट्ट्यात अजून कहर सुरूच आहे. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार अतिवृष्टी हे नित्याचे झाल्याने अनेक ठिकाणी ऊस पीक भुईसपाट झाले आहे.

कोवाड : परतीच्या पावसाचा ऊस पट्ट्यात अजून कहर सुरूच आहे. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार अतिवृष्टी हे नित्याचे झाल्याने अनेक ठिकाणी ऊस पीक भुईसपाट झाले आहे. यामुळे यंदा चंदगड तालुक्‍यात साखर हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. 

ऑक्‍टोबर महिना संपत आला तरी यावर्षी पावसाने पाठ सोडली नाही. तालुक्‍यात 10500हेक्‍टर क्षेत्रात उसाची लागवड केली आहे, पण परतीच्या पावसाने उसाला फटका बसला आहे. तालुक्‍यात हेमरस, अथर्व व इको केन हे तीन साखर कारखाने व गडहिंग्लज साखर कारखाना गाळपासाठी सज्ज आहे.

आजरा कारखानाही सुरु करण्याच्या हालचाली आहेत. 15 ऑक्‍टोंबरपासून राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होणार होता, परंतु पावसामुळे तो पुढे ढकलला जात आहे. बीड, उस्मानाबाद, विजारपूर येथून दरवर्षी येणारे ऊस तोडणी मजूर तालुक्‍यात दाखल झाले आहेत, पण फडातून पावसाचे पाणी वाहू लागल्याने तोडणी अवघड झाली आहे. तोडणी मजुरांच्या राहण्याचा व जेवण खाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. पडलेला ऊस कुजण्याची भीती आहे. त्यामुळे लवकरात लवकर तोडणी सुरु व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ठिकठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडत असल्याने रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. शेतातून दलदल झाली आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain damage to sugarcane in Kowad Kolhapur Marathi News