राजापूर बंधारा झाला मजबूत ; मिळणार १५ हजार हेक्टर शेतीला मुबलक पाणी.... 

डी. आर. पाटील
Friday, 24 April 2020

  1. बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी तब्बल साडेसात कोटीचा निधी उपलब्ध... 
  2. इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ आणि जयसिंगपूरचा पाणी प्रश्न  लागला मार्गी.. 

शिरोळ (कोल्हापुूर) : राजापूर (ता.शिरोळ) येथील बंधाऱ्याला गळतीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. यामुळे लाखो लोकांसह हजारो हेक्टर शेतीच्या पाण्याचा धोका निर्माण झाला असताना माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नाने बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी तब्बल साडेसात कोटीचा निधी उपलब्ध झाला. बंधाऱ्याच्या डागडुजीचे काम झाल्याने गळती तर बंद झालीच शिवाय इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ आणि जयसिंगपूरचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून १४ हजार ७३५ हेक्टर शेतीच्याही पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऐन उन्हाळ्यातही शिरोळ तालुक्यातील ४० हून अधिक गावातील सुमारे 10 लाख लोकांच्या पिण्याचाही प्रश्न ‘मिटला आहे.

    तत्कालीन आमदार स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी दुरदृष्टिने १९८० साली राजापूर बंधाऱ्याची निर्मिती केली. यानंतर हा बंधारा शिरोळ तालुक्यासह इचलकरंजी शहराला वरदान ठरला. यानंतरच्या काळात मात्र  बंधाऱ्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने धोका निर्माण  झाला. सतरा वर्षापूर्वी कर्नाटकातील शेतकर्यानी बंधाऱ्यावर हल्ला चढवत पाणी पळविण्याचा प्रयत्न केला होता. बंधाऱ्याला धोका झाल्याने भविष्यातील पाणीबाणी लक्षात घेऊन माजी आमदार उल्हास पाटील यांनी दोन वेळा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केलाच शिवाय तत्कालीन मंत्र्यांनाही बंधाऱ्यावर नेऊन बंधाऱ्याची स्थिती दाखवत हा निधी खेचून आणला होता. 

कोरोना संशयित युवती मुळे शिरोळ तालुक्यात घबराहट... -

उल्हास पाटील यांचा पाठपुरावा

   दोन टप्प्यात साडेसात कोटीचा निधी आणून वेळोवेळी बंधाऱ्याला भेट देऊन दर्जेदार काम करुन घेतले आहे. आज बंधारा पूर्णपणे मजबूत झाला असून येणाऱ्या ४० ते ५० वर्षासाठी तो भक्कमपणे साथ देणार आहे. आज बंधाऱ्यात १५ फूट पाणी असून सुमारे २५ किमी अंतरावर बॅकवॉटरचा लाभ सुमारे ४० हून अधिक गावांना झाला आहे. उन्हाळ्यातही पिण्याचा प्रश्न भेडसावला नाहीच शिवाय शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीसाठीही उल्हास पाटील यांनी आंदोलनातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

लॉकडाउन तोडून या गावात आला परदेशी पाहुणा... -

 शेतीला मिळणार मुबलक पाणी

 साडेसात कोटी खर्चून बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे येणाऱ्या ४० ते ५० वर्षात तरी बंधारा खंबीरपणे पिण्यासह शेतीच्या पाण्याची तजवीज करणारा ठरणार आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नामुळे आज चार नगरपालिकांसह सुमारे ४० गावांसह पंधरा हजार हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यासाठी वरदान असणारा राजापूर बंधारा कमकुवत झाला होता. भविष्यातील धोके लक्षात घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. तत्कालीन मंत्री गिरीष महाजन, विजयबापू शिवतारे यांच्या मार्फत दोन टप्प्यात साडेसात कोटीचा निधी आणला. आज बंधारा भक्कम झाला आहे. चार नगरपालिका, ४० गावांची तहान भागविणारा आणि पंधरा हजार हेक्टर शेतीला फायदेशीर हा बंधारा दुरुस्त केल्याचे समाधान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajapur dam became strong in shirol kolhapur marathi news