राजाराम कारखाना प्रतिटन १०७ रुपये देणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

महादेवराव महाडिक; महिनाअखेरीस जमा, २०१७-१८ मधील आश्‍वासनपूर्ती

कसबा बावडा (कोल्हापूर) :  कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याकडून २०१७-१८ हंगामातील तुटलेल्या उसाला आणखी प्रतिटन १०७ रुपये देण्यात येतील. आठवडाभरात ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली.

‘राजाराम’ची हंगाम २०१७-१८ मधील कायद्यानुसार एफआरपी प्रतिटन २६९३ रुपये होती, ही रक्कम यापूर्वीच अदा केली आहे. याच हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा प्रतिटन २०७ रुपये जादा देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला होता. त्यानुसार यापैकी प्रतिटन १०७ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे श्री. महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा- पासपोर्टचा कोल्हापूर कॅम्प बंद ; कोरोनातही परदेशवारीला पसंती -

२०१७-१८ च्या हंगामात कारखान्याने ९७ हजार ५० टन गाळप झालेल्या उसाला एफआरपी २६९३ व त्यावर जादा २०७ रुपये असे एकूण २९०७ रुपये दिले आहेत. उर्वरित तीन लाख ४५ हजार ६६२ टन गाळप ऊसाला एफआरपीप्रमाणे रक्कम दिली आहे; पण संबंधित शेतकऱ्यांना वाढीव प्रतिटन २०७ रुपये दिलेले नव्हते. दसरा, दिवाळी सणांसाठी दिलासा म्हणून प्रतिटन १०७ रुपये महिनाअखेरीस खात्यावर जमा होईल, पत्रकात म्हटले आहे. उर्वरित रक्कम देण्याचे अभिवचन पूर्ण करण्यासाठी वाटचाल करत असल्याचेही सांगितले. अध्यक्ष सर्जेराव शिंदे, उपाध्यक्ष वसंत बेनाडे व संचालक उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajaram factory will pay Rs 107 per tonne