सरकारकडे आम्ही ताजमहल, चंद्र-तारे मागत नाही तर....

संदीप खांडेकर
Monday, 10 August 2020

तीन महिन्याचे बिल माफ करावे, अशी मागणी... 

कोल्हापूर - मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न केल्यास सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.  महावितरण ग्राहकांना दिलेल्या वीज बिल विरोधी सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलनात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे आयोजन केले होते.

श्री. शेट्टी म्हणाले, "विज बिल दरवाढीचा प्रश्न केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा नाही. तो राज्याचा आहे‌. कोरोनाच्या संचारबंदीमुळे लोकांना रोजगार नाही. त्यांच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी बिले भरायची कशी, असा प्रश्‍न आहे. महावितरण चेष्टेचा विषय होत आहे. सरकार त्याकडे डोळे उघडून पाहायला तयार नाही. आम्ही केवळ तीन महिन्याचे बिल माफ करावे, अशी मागणी करत आहोत. सरकार ती मागणी मान्य करणार नसेल तर आक्रमक आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही."

वाचा - पुन्हा राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले ; पंचगंगा परत धोक्‍याच्या पातळीकडे जाण्याची शक्यता 

ते म्हणाले, "वीज ग्राहकांचे बिल माफ करणे न्यायाचे आहे. कष्टकरी माणसे संचारबंदीमुळे घरात कोंडून आहेत. पैसे भरण्याची त्यांची स्थिती नाही. त्यामुळे सरकारने या प्रश्‍नात लक्ष घालून वीज बिल माफ करण्याची भूमिका घ्यावी."

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले, "ग्राहकांना दिलेल्या वीज बिलासंदर्भात आमचे काही म्हणणे नाही. वाढीव दरवाढीनुसार ती बरोबर आहेत. लोकांच्या हाती बिल भरायला पैसे नसल्याने बिले माफ करावीत, इतकीच आमची सरकारपुढे मागणी आहे. हा आकडा सरकारवर नक्कीच बोजा टाकणारा नाही. साधारणपणे ३८०० कोटी रुपये सरकारला भरावे लागतील आणि ग्राहकांची बिले माफ करावी लागतील."
माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, प्रा. जालंदर पाटील, विक्रांत पाटील-किणीकर, यशवंतराव शेळके, बाबासाहेब देवकर, स्वप्नील पार्टे आंदोलनात सहभागी झाले होते. 

आमच्याकडे पैसे नाहीत

घरगुती वीज बिले दुप्पट आहेत आमच्याकडे पैसे नाहीत,  वीज बिले माफ करावीत सरकारने भरपाई द्यावी, आम्ही लाॅकडाऊन होतो सरकारने बिल माफ करावे, या आशयाचे फलक आंदोलकांनी मंडपातील खांबांवर लावून नागरिकांचे लक्ष वेधले.

संयमाचा अंत पाहू नये

यावेळी श्री. शेट्टी म्हणाले, "सरकारकडे आम्ही ताजमहल, चंद्र-तारे मागत नाही. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेचे आहे. घरगुती ग्राहक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घेऊन वीज बिले माफ करावीत. ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नये."

संपादन - मतीन शेख
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetti state level movement against electricity bill