...तर सरकारला गुडघे टेकायला लावू ; राजू शेट्टी यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

राजू शेट्टी; वाढीव वीज बिलविरोधात सर्वपक्षीय आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : एप्रिल ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न केल्यास सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी  दिला. महावितरणने ग्राहकांना दिलेल्या वाढीव वीज बिलविरोधी सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलनात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. दरम्यान, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. 

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘वीज बिल दरवाढीचा प्रश्न केवळ जिल्ह्याचा नाही, तो राज्याचा आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे लोकांना रोजगार नाही. त्यांच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी बिले भरायची कशी, असा प्रश्‍न आहे. महावितरण चेष्टेचा विषय होत आहे. सरकार त्याकडे डोळे उघडून पाहायला तयार नाही. आम्ही केवळ तीन महिन्यांचे बिल माफ करावे, अशी मागणी करत आहोत. सरकार ती मागणी मान्य करणार नसेल तर आक्रमक आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.’’

हेही वाचा- शिक्षकांच्या रिक्त पदामुळे शाहूवाडीत शिक्षणाचा बोजवारा उडणार -

ते म्हणाले, ‘‘वीज बिल माफ करणे न्यायाचे आहे. 
कष्टकरी माणसे संचारबंदीमुळे घरात कोंडून आहेत. पैसे भरण्याची त्यांची स्थिती नाही. त्यामुळे सरकारने लक्ष घालून वीज बिल माफ करण्याची भूमिका घ्यावी.’’ 
आमदार जाधव म्हणाले, ‘‘उद्योजकांनाही वीज दरवाढ प्रश्‍न भेडसावत आहे. त्याची कल्पना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिली आहे. घरगुती वीज ग्राहक बिल भरू शकत नाही, याची जाणीव आहे. मंत्र्यांच्या बैठकीत बिल माफ करण्यासंदर्भात आवाहन केले जाईल.’’

हेही वाचा-सावधान ः ऑक्‍सिमीटर अँपचे फसवे जाळे, बनावट अॅपकडून डेटा चोरीचा धोका -

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले, ‘‘ग्राहकांना दिलेल्या वीज बिलासंदर्भात आमचे काही म्हणणे नाही. वाढीव दरवाढीनुसार ती बरोबर आहेत. लोकांच्या हाती बिल भरायला पैसे नसल्याने बिले माफ करावीत, इतकीच सरकारकडे मागणी आहे. हा आकडा सरकारवर नक्कीच बोजा टाकणारा नाही. साधारणपणे ३८०० कोटी रुपये सरकारला भरावे लागतील आणि बिले माफ करावी लागतील.’’ महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्कप्रमुख विक्रांत पाटील यांनी केंद्र व राज्यसरकार असंवेदनशील असल्याची टीका केली. 
माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, प्रा. जालंदर पाटील, यशवंतराव शेळके, बाबासाहेब देवकर, स्वप्नील पार्टे, राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील आंदोलनात सहभागी झाले.

लक्षवेधी फलक
घरगुती वीज बिले दुप्पट आहेत, आमच्याकडे पैसे नाहीत, वीज बिले माफ करावीत सरकारने भरपाई द्यावी, आम्ही लॉकडाउन होतो सरकारने बिल माफ करावे, या आशयाचे फलक आंदोलकांनी मंडपातील खांबांवर लावून नागरिकांचे लक्ष वेधले.

सरकारकडे ताजमहल, चंद्र-तारे मागत नाही
यावेळी श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘सरकारकडे आम्ही ताजमहल, चंद्र-तारे मागत नाही. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेचे आहे. घरगुती ग्राहक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घेऊन वीज बिले माफ करावीत. ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नये.’’

हेही वाचा-अशी झाली जोतिबाची नगरप्रदक्षिणा,अकरा ग्रामस्थांची उपस्थीती, भाविकांना परवानगी नाकारली -

सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रमाणे शेतकरी आत्महत्यांची चर्चा का नाही? : राजू शेट्टी

अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रमाणे शेतकरी व विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची चर्चा का होत नाही? असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे उपस्थित केला. महावितरणने वीज ग्राहकांना दिलेल्या वाढीव वीज बिलांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन झाले.

यावेळी श्री. शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रमाणे सर्वसामान्यांच्या आत्महत्यांची चर्चा व्हायला हवी. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; पण त्यावर किती चर्चा झाली? शेतकरी रुपयाला महाग झाला आहे. त्याचे दु:ख समजून घ्यायला वाली नाही. सुशांतसिंहप्रकरणी तपासाला रोज नवी दिशा मिळत आहे. एखाद्या अभिनेत्याने आत्महत्या केल्यावर किती चर्चा होऊ शकते, यावरून आपण कोठे जात आहोत, हे समजून येते.’’

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty All party agitation against rising electricity bills Statement to the Collector