विधान परिषदेवर राजू शेट्टी स्वतः की कार्यकर्ता? 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

राजू शेट्टी यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांकडूनच त्यांचे नांव पुढे रेटण्याचा सुरू आहे.

कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना "ऑफर' देण्यात आली असली तरी शेट्टी हे स्वतः विधानपरिषदेवर जाणार की कार्यकर्त्याला संधी देणार याविषयी उत्सुकता आहे. 

राजू शेट्टी यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांकडूनच त्यांचे नांव पुढे रेटण्याचा सुरू झालेल्या प्रयत्नामुळे संघटनेतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता दिसत आहे. शेट्टी हे नांवच एक चळवळ आहे, ते काहीही बोलले तरी त्याची बातमी होती. दोनवेळा खासदार आणि एकदा जनेततून आमदार झालेले शेट्टी हे देश पातळीवर पोचलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्याला संधी देऊन विधानपरिषदेतील संघटनेचा दबदबा वाढवावा अशीही अपेक्षा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. 

"स्वाभिमानी'च्या स्थापनेनंतर संघटनेला अनेक धक्के बसले असले तरी त्याला शेट्टी यांच्या स्वकेंद्रीत राजकारणही कारणीभूत आहे. त्यातून संघटनेची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले लक्ष्मण वडले, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार उल्हास पाटील, सांगलीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव मोरे, अलिकडेच त्यांची साथ सोडलेले जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी संघटनेला रामराम ठोकला.

युवानेते रविकांत तुपकर गेले आणि परतही आले. तुपकर यांचा अपवाद सोडला तर संघटनेतून गेलेला माणूस परत आलेला नाही; पण त्यामुळे संघटनेचा आवाज कमी झालेला नाही. 
राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीतच सावकार मादनाईक यांनी या निवडीत कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केल्याचे समजते. पण त्याच बैठकीत श्री. शेट्टी यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून मात्र "स्वतः साहेबच पाहिजे', "त्यांच्याशिवाय चालत नाही' असा सूर आळवला. 

...तर तो शेट्टींचा सन्मान 
जवळच्या कार्यकर्त्यांपेक्षा संघटनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष करून श्री. शेट्टी यांना चालणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःऐवजी कार्यकर्त्याला संधी दिली तर संघटनेचा आणि श्री. शेट्टी यांचाही तो एक सन्मान ठरेल अशा भावना कार्यकर्त्यांत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty's own activist on the Legislative Council?