शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आणि खांबावरून पडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

विद्युत ट्रान्सफॉर्मरचे काम करताना वीज प्रवाह अचानकपणे सुरू झाल्याने विजेचा धक्‍क्‍याने भाजून तसेच खांबावरून पडल्याने "महावितरण'चे कर्मचारी किरण भाऊ चव्हाण (वय 37, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) गंभीर जखमी झाले.

बाजार भोगाव (कोल्हापूर)  ः विद्युत ट्रान्सफॉर्मरचे काम करताना वीज प्रवाह अचानकपणे सुरू झाल्याने विजेचा धक्‍क्‍याने भाजून तसेच खांबावरून पडल्याने "महावितरण'चे कर्मचारी किरण भाऊ चव्हाण (वय 37, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास वाळोली (ता. पन्हाळा) येथे ही दुर्घटना घडली.

घटनास्थळी प्राप्त माहितीनुसार, किरण चव्हाण "महावितरण'च्या कळे कार्यालयांतर्गत विद्युत वाहिनी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वाळोलीचा चार्ज आहे. गावातील म्हामुलकर डीपीवर तांत्रिक बिघाड झाल्याने कालपासून परिसरातील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा बंद आहे. सध्या पाऊस नसल्याने भातरोप लावण खोळंबल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी आठला ते डीपीजवळ आले. कळे कार्यालयाकडील रीतसर परवानगी घेऊन त्यांनी विद्युत प्रवाह बंद करून घेतला; पण काम करत असतानाच साडेआठच्या सुमारास अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांच्या उजव्या हातासह, छाती व डाव्या पायाला भाजून जखम झाली. याच अवस्थेत ते खांबावरुन कोसळले. गंभीर जखमी स्थितीत त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ran to the aid of the peasants and fell off the pole